स्वीडन व फिनलंडने आताच नाटोत सहभागी व्हायला हवे

- नाटोच्या माजी प्रमुखांचे आवाहन

स्वीडन व फिनलंडने

ब्रुसेल्स – रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असल्याने स्वीडन व फिनलंडने याच काळात नाटोत सामील होण्यासाठी हालचाली कराव्यात, असे आवाहन नाटोचे माजी प्रमुख अँडर्स फॉग रासमुसेन यांनी केले आहे. जर हे देश आता नाटोचा भाग बनले नाहीत तर त्यांना पुढील काळात रशियन दडपण व धमक्यांना सामोरे जावे लागेल, असे रासमुसेन यांनी बजावले.

स्वीडन व फिनलंडने

गेल्या महिन्यात ब्रुसेल्स येथे नाटो देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. युक्रेन युद्ध व नाटोची भूमिका या मुद्यावर सदर बैठकीत चर्चा झाली. रशियाचा धोका वाढत असल्याचे सांगून काही सदस्य देशांनी नाटोचा विस्तार करण्याची मागणी केली होती. तर नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी रशियाच्या आक्रमकतेमुळे पूर्व युरोपातील काही देश नाटोत सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी फिनलँड व स्वीडन नाटोत सहभागी होण्यासाठी तयार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या दोन्ही देशांच्या नेत्यांनी नंतर आघाडीच्या युरोपिय नेत्यांसह नाटोचे प्रमुख स्टॉल्टननबर्ग यांचीही भेट घेतली होती.

स्वीडन व फिनलंडने

यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. स्वीडन व फिनलँड हे देश नाटोत सामील झाले तर रशिया बाल्टिक क्षेत्रात अतिरिक्त अण्वस्त्रे तैनात करील, असा इशारा रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला होता. बाल्टिकमधील आण्विक तैनातीबरोबरच रशिया फिनलँडच्या आखातातील संरक्षणतैनातीदेखील वाढविल, असेही मेदवेदेव्ह यांनी बजावले. रशियाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतरही स्वीडन व फिनलँड या दोन्ही देशांकडून नाटोतील सहभागासाठी पुढील हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या नाटोच्या बैठकीत दोन्ही देशा नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर नाटोच्या माजी प्रमुखांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सध्या युक्रेनच्या संघर्षात व्यस्त आहेत. त्यामुळे फिनलँड व स्वीडनला नाटोचे सदस्य होण्यासाठी आताच संधी आहे. पुतिन सध्या काही करु शकणार नाहीत. मात्र आताची संधी गमावली तर दोन्ही देशांना रशियाच्या दडपणाचा व धमक्यांचा सामना करावा लागेल. भविष्यात नाटोचे सदस्य बनण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो’, असे रासमुसेन यांनी सांगितले.

फिनलँड आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आत्तापर्यंत नाटोत सामील होण्याचे टाळले होते. दोन्ही देशांच्या जनतेने देखील नाटोतील सहभागाला विरोध केला होता. पण युक्रेनच्या युद्धामुळे या दोन्ही देशांमधील जनमत बदलू लागल्याचे मानले जाते.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info