‘रेड सी’मध्ये इराणच्या जहाजावर हल्ला – हल्ल्यामागे इस्रायल असल्याचा अमेरिकन वर्तमानपत्राचा दावा

‘रेड सी’मध्ये इराणच्या जहाजावर हल्ला – हल्ल्यामागे इस्रायल असल्याचा अमेरिकन वर्तमानपत्राचा दावा

दुबई/तेहरान/जेरूसलेम – गेली काही वर्षे ‘रेड सी’च्या क्षेत्रात तळ ठोकून असलेल्या इराणच्या जहाजावर हल्ला झाला. इराणने या हल्ल्याची कबुली दिली असून याची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. पण इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून वापरल्या जाणार्‍या या जहाजावर इस्रायलनेच हल्ला चढविल्याचा आरोप अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. अमेरिकी वर्तमानपत्राच्या या आरोपांवर इस्रायलने उत्तर देण्याचे टाळले आहे. पण जिथे गरज असेल तिथे आम्ही नक्की कारवाई करू, असे सूचक उद्गार इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी काढले आहेत. दहा दिवसांपूर्वी इस्रायलच्या मालवाहू जहाजांवर हल्ला झाला होता व त्यानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर मिळेल, असे धमकावले होते.

रेड सीच्या क्षेत्रात उभ्या असलेल्या इराणच्या ‘एमव्ही साविझ’ जहाजात मंगळवारी स्फोट झाला. पुढच्या काही तासातच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या जहाजावर हल्ला झाल्याचे जाहीर केले. पण या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी दिली. ‘लिप्मेट माईन’ अर्थात युद्धनौका किंवा जहाजांला बाहेरुन बसविण्यात येणार्‍या व पाण्यातच स्फोट घडविणार्‍या स्फोटकांचा वापर यासाठी करण्यात आल्याचे इराणच्या वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. पण आपल्या जहाजावरील या हल्ल्यासाठी इराणने कुणालाही जबाबदार धरण्याचे टाळले.

मात्र, ‘द न्यूयॉक टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने पुन्हा एकदा इराणी जहाजावरील या हल्ल्यासाठी इस्रायलच जबाबदार असल्याचा दावा आपल्या बातमीमध्ये केला आहे. नाव उघड न करण्याच्या शर्तीवर एक अमेरिकी अधिकार्‍याने आपल्याला ही माहिती दिल्याचे सदर वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी इराणच्या जहाजावर हल्ला चढविण्यात येईल, याची माहिती इस्रायलने अमेरिकेला कळविली होती, असे या वर्तमानपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे. महिन्याभरापूर्वी रेड सीच्या क्षेत्रातच इराणच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यासाठी देखील इस्रायल जबाबदार होता, असा दावा या वर्तमानपत्राने केला होता. त्याचबरोबर व्हिएन्ना येथे इराणच्या अणुकरारावर चर्चा सुरू असताना हा स्फोट झाल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने लक्षात आणून दिले आहे.

रेड सी

अमेरिकी वर्तमानपत्राच्या या आरोपांबाबत माध्यमांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांना प्रश्‍न विचारले. गांत्झ यांनी या प्रश्‍नांचे उत्तर देण्याचे टाळले. मात्र इराण आणि या क्षेत्रातील इराणसंलग्न संघटना इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी इस्रायलने आवश्यक ती पावले उचलणे सुरू ठेवले पाहिजे. इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान मिळेल, तिथे नक्कीच कारवाई केली जाईल, असे सूचक उद्गार गांत्झ यांनी काढले.

इराणचे ‘एमव्ही साविझ’ जहाज २०१६ सालापासून रेड सीच्या क्षेत्रात आणि येमेनच्या किनारपट्टीजवळ तैनात आहे. रेड सी, बाब अल-मन्दाब या सागरी क्षेत्रातील चाचेगिरीविरोधी कारवाईसाठी या जहाजाची तैनाती केल्याचा दावा इराणने याआधी केला होता. पण इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून नियंत्रित केले जाणारे हे साविझ जहाज हेरगिरीसाठी वापरले जाते. त्याचबरोबर येमेनमधील हौथी बंडखोरांना शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी देखील या जहाजाचा वापर केला जात असल्याचे आरोप सौदी अरेबियाने याआधी केले होते. सदर जहाजावर इराणी लष्कराचे जवान तैनात असल्याचे व यावर इराणच्या छोट्या गस्तीनौका असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info