अमेरिका ‘कॉमनवेल्थ’चा सहयोगी सदस्य बनेल – ब्रिटनचे नेते निगेल फॅराज यांचा दावा

अमेरिका ‘कॉमनवेल्थ’चा सहयोगी सदस्य बनेल – ब्रिटनचे नेते निगेल फॅराज यांचा दावा

लंडन – ‘कॉमनवेल्थ’मध्ये अमेरिका देखील सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवित असल्याचा दावा करून ब्रिटनचे नेते ‘निगेल फॅराज’ यांनी खळबळ उडवून दिली आहे. एका मुलाखतीत फॅराज यांनी हा दावा करून अमेरिकेला ‘कॉमनवेल्थ’मध्ये स्वारस्य असल्याचे सिद्ध करणारी उदाहरणेही दिली आहेत. कॉमनवेल्थ आणि अमेरिकेमध्ये विकसित होत असलेले हे संबंध ब्रेक्झिटनंतरच्या काळात ब्रिटनला फार मोठे बळ देत असल्याचा दावाही फॅराज यांनी केला आहे.

‘युनायटेड किंगडम इंडिपेंडंट पार्टी’ या पक्षाचे प्रमुख असलेले निगेल फॅराज हे ‘ब्रेक्झिट’चे कडवे समर्थक मानले जातात. एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फॅराज यांनी अमेरिका कॉमनवेल्थमध्ये फार मोठे स्वारस्य दाखवित असल्याचा दावा केला. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी आपले बोलणे झाले व त्यांनी कॉमनवेल्थबाबत खूप उत्सुकता दाखविली, असे फॅराज म्हणाले. याच्या व्यतिरिक्त गेल्या काही दिवसांपासून अमेरिका कॉमनवेल्थला सकारात्मक संदेश देत असल्याचे निगेल फॅराज यांनी स्पष्ट केले. नुकतीच ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थच्या सदस्यदेशांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद पार पडली. या परिषदेला अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याचे गव्हर्नर फिल ब्रायंट आणि ओक्लाहोमा राज्याचे गव्हर्नर मॅरी फॅलिन उपस्थित होते.

‘कॉमनवेल्थ सोसायटी’चे ऑफिस नुकतेच अमेरिकेत सुरू करण्यात आले व याच्या उद्घाटनाला अमेरिकेचे व्यापारमंमत्री विलबर रॉस आणि शिक्षणमंत्री बेस्टी डेव्होस उपस्थित होते, याकडे फॅराज यांनी लक्ष वेधले. अमेरिकेच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितत कॉमनवेल्थच्या ऑफिसचे उद्घाटन होणे ही सर्वसाधारण बाब नाही, असा दावा फॅराज यांनी केला. मात्र अमेरिका कॉमनवेल्थचा सर्वसाधारण सदस्यदेश बनू शकणार नाही. तसे झाले तर त्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर घणाघाती टीका होईल, याचीही जाणिव फॅराज यांनी करून दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला पुन्हा ब्रिटनच्या साम्राज्यवादी जोखडाखाली आणत असल्याचा आरोप टीकाकार करू शकतात, असे फॅराज म्हणाले.

म्हणूनच अमेरिका ‘कॉमनवेल्थ’चा सहयोगी सदस्य बनू शकेल. याचे फार मोठे लाभ ब्रिटनला मिळतील. युरोपिय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनसमोर खडे ठाकलेल्या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे हे पाठबळ ब्रिटनसाठी अतिशय आवश्यक आहे, याचाही जाणिव फॅराज यांनी करून दिली. मुख्य म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यासाठी अनुकूल असल्याचे फॅराज यांचे म्हणणे आहे. इंग्रजी भाषेने एकमेकांशी जोडले गेलेल्या देशांकडे बरेच काही वेगळे असल्याची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची धारणा आहे, असे अत्यंत महत्त्वपूर्ण उद्गार यावेळी फॅराज यांनी काढले. त्याचवेळी आजवर ‘कॉमनवेल्थ’ देशांमधील व्यापाराकडे दुर्लक्ष करणार्‍या आधीच्या ब्रिटिश सरकारांवर निगेल फॅराज यांनी सडकून टीका केली आहे. कॉमनवेल्थ’पेक्षा या सरकारांना ब्रुसेल्समध्ये मुख्यालय असलेल्या युरोपिय महासंघाचे अधिक महत्त्व वाटत होते, असा ठपका फॅराज यांनी ठेवला.

दरम्यान, कॉमनवेल्थ ही ब्रिटनच्या अधिपत्याखाली स्थापन झालेली जगातील सर्वात जूनी संघटना असून सहा खंडांमधले सुमारे ५३ देश या संघटनेचे सदस्य आहेत. आजवर या संघटनेच्या व्यापारी क्षमतेकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक झाली, याची कबुली ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थच्या परिषदेत दिली होती. त्यांची ही कबुली व निगेल फॅराज यांनी कॉमनवेल्थमध्ये अमेरिका दाखवित असलेल्या स्वारस्याबद्दलची माहिती लक्षात घेता, नजिकच्या काळात ही संघटना जगात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सिद्ध होत असल्याचे दिसते.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info/posts/387224751686015