Breaking News

२००८ सालापेक्षा भयंकर आर्थिक संकट कोसळण्याची भीती – गुंतवणूकदार पीटर शीफ यांचा इशारा

वॉशिंग्टन – २००८ साली कोसळलेल्या आर्थिक संकटानंतर जगाने काहीही धडा घेतलेला नाही. त्यामुळे अधिक भयंकर आर्थिक संकट लवकरच कोसळणार असून अमेरिकी डॉलरच्या अपयशामुळे यावेळची अवस्था अधिक भयावह असेल, असा खळबळजनक इशारा अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार पीटर शीफ यांनी दिला.

नव्या आर्थिक संकटाचे मूळ अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील प्रचंड कर्जात असेल, असा दावाही शीफ यांनी केला. दशकभरापूर्वी अमेरिकेसह जगाला मंदीत लोटणार्‍या आर्थिक संकटाची पूर्वसूचना देणारे गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ अशी शीफ यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

पीटर शीफ

दशकभरापूर्वी अमेरिकेच्या गृहकर्जाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा जबरदस्त फटका बसला होता. त्यानंतरही जागतिक अर्थव्यवस्थेने चुका सुधारल्या नसल्याचा दावा करून पीटर शीफ यांनी येणार्‍या आर्थिक संकटाची जाणीव करून दिली. ‘यापूर्वी प्रचंड विस्तार असलेल्या बँकांना कोसळण्यापासून वाचविण्यात आले होते. अशा बँकांचा आकार आता अधिकच वाढला असून वाढते दर व मंदीला त्या सहज बळी पडू शकतात. त्यामुळे २००८ साली अर्थव्यवस्थेला असलेल्या धोक्यांच्या तुलनेत सध्या असलेले धोक्यांची व्याप्ती अधिकच वाढली आहे’, असे शीफ यांनी बजावले.

यापूर्वी अर्थसहाय्य देऊन वाचविलेल्या बँकांना आधीच कोसळून द्यायला हवे होते, मात्र सरकारने नैतिकतेच्या मुद्यावर आर्थिक सहाय्याची भूमिका घेतली, असा दावा त्यांनी केला. ‘त्यानंतरही चुकांमधून कोणतेच धडे शिकण्यात आलेले नाहीत. उलट आपण सर्वजण यापूर्वी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करीत असून त्यांची व्याप्तीही वाढवित आहोत. यातूनच पुढे येणारे संकट पूर्वीपेक्षा अधिक भयंकर असेल याची तजवीज करून ठेवली आहे’, असा गंभीर इशारा शीफ यांनी दिला.

२००८ साली आलेल्या आर्थिक संकटानंतर आखण्यात आलेले आर्थिक व वित्तीय धोरण अधिकच वाईट असून त्यातून नव्या संकटाची जणू हमीच देण्यात आली असल्याचे अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी बजावले. नव्या आर्थिक संकटासाठी सरकारच मूळ कारण ठरणार असून अनेकांना त्यामुळे आश्‍चर्याचा धक्का बसेल, असा दावा पीटर शीफ यांनी केला. त्याचवेळी पुढील आर्थिक संकट मागच्या वेळेपेक्षा काही प्रमाणात वेगळे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अमेरिकेच्या कोषागार विभागाने घेतलेले कर्ज पुढील आर्थिक संकटातील लक्ष वेधून घेणारा मुद्दा असेल. अमेरिकी डॉलर कोसळणार असून सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झालेली असेल. ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या दरांमध्येही प्रचंड वाढ होणार आहे. या सर्व गोष्टी संभाव्य आर्थिक संकट अधिकाधिक भयंकर करणार्‍या ठरतील’, असा इशारा पीटर शीफ यांनी दिला.

काही महिन्यांपूर्वी शीफ यांनी व्यापारयुद्ध अमेरिकीसाठी घातक ठरण्याचे बजावून डॉलर कोसळेल, असा दावा केला होता.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info