वॉशिंग्टन – रशिया व चीन हे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी या देशांबरोबर युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे अमेरिकेच्या सैनिकांना वाटू लागले आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून अमेरिकन सैनिकांना रशिया व चीनबरोबरील युद्ध अटळ असल्याची बाब अमेरिकन सैनिकांना वाटत असल्याचे उघड झाले आहे.
अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित एका वृत्तसंस्थेने सर्वच दलातील सैनिकांची मते आजमविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अमेरिकेतील अंतर्गत राजकारण, सुरक्षाविषयक मुद्दे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींबाबत या सैनिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये भविष्यात युद्धाची शक्यता आहे का, असा प्रश्नही अमेरिकी सैनिकांना विचारला होता. 46 टक्के सैनिकांनी युद्धाची दाट शक्यता असल्याचे म्हटले असून रशिया व चीनबरोबर अमेरिकेचे युद्ध पेटेल, असा दावा या सैनिकांनी केला आहे.
यापैकी 71 टक्के अमेरिकी सैनिकांनी रशिया हा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी जवळपास 53 टक्के अमेरिकी सैनिकांना रशिया अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचे वाटते होते. तर चीनकडून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे मानणार्या अमेरिकी सैनिकांची संख्या 44 टक्के होती. पण यावर्षी 68 टक्के अमेरिकी सैनिकांनी रशिया खालोखाल चीन देखील अमेरिकेच्या सुरक्षेला आव्हान देऊ शकतो, असे म्हटले आहे. या दोन्ही देशांनी गेल्या वर्षभरात आपल्या शस्त्रसज्जतेत केलेली वाढ व अमेरिकेबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा धोका वाढल्याचे अमेरिकी सैनिकांचे म्हणणे आहे, असे सदर लष्करी वृत्तसंस्थेने स्पष्ट केले.
रशिया व चीन अमेरिकेसाठी उघड शत्रू आहेत. त्यामुळे येत्या काळात अमेरिका या देशांबरोबर युद्ध छेडू शकते. पण या दोन्ही देशांपेक्षाही अमेरिकेच्या सुरक्षेला सायबर युद्धाचा सर्वाधिक धोका असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सुमारे 89 टक्के अमेरिकी सैनिकांनी अमेरिकेवर सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली असून या सायबर हल्ल्यांपासून अमेरिकेला सुरक्षित ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल, असे अमेरिकी सैनिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सायबर हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे प्रशासकीय तसेच लष्करी स्तरावर मोठे नुकसान झाले आहे, याची आठवण अमेरिकी सैनिकांनी या सर्वेक्षणात करून दिली.
दरम्यान, अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हा धोका वाढत असताना 44 टक्के अमेरिकी सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील अमेरिकी सैनिकांचा विश्वास वाढल्याचे यामुळे समोर आले आहे.
मराठीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |