रशियाकडून अमेरिकी डॉलर्समधील गुंतवणूक शून्यावर आल्याचा दावा – सोन्यातील गुंतवणूक विक्रमी स्तरावर

रशियाकडून अमेरिकी डॉलर्समधील गुंतवणूक शून्यावर आल्याचा दावा – सोन्यातील गुंतवणूक विक्रमी स्तरावर

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका डॉलरचा शस्त्रासारखा वापर करीत आहे, असा आरोप करणार्‍या रशियाने अमेरिकेचे हे शस्त्र बोथट करण्याची तयारी केली आहे. यासाठी रशियाने अमेरिकी डॉलर्समधील आपली गुंतवणूक जवळपास शून्यावर आणली असून सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. रशियाचा हा निर्णय म्हणजे आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकेच्या डॉलरला दिलेला फार मोठा हादरा ठरतो. यामुळे रशियाने आपल्यावर निर्बंध लादणार्‍या अमेरिकेबरोबर आर्थिक पातळीवरील युद्धच पुकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

गेल्या वर्षभरात चीन, जपान, भारत, तुर्की यासारख्या देशांकडूनही अमेरिकी डॉलर्समधील गुंतवणूक टप्प्याटप्पाने कमी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. चीनने गेल्याच आठवड्यात तीन अब्ज डॉलर्सच्या कर्जरोख्यांची विक्री करून धक्का दिला होता. चीनकडून गेले तीन महिने सातत्याने अमेरिकी कर्जरोख्यांची विक्री सुरू असून ही विक्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धाविरोधात दिलेला ‘वॉर्निंग शॉट’ असल्याचे सांगण्यात येते.

जपानने आपल्याकडील अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक १.०२९ लाख कोटी डॉलर्सपर्यंत खाली आणली असून हा २०११ सालानंतरचा नीचांक आहे. तुर्कीने आपल्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीत ४२ टक्क्यांनी कपात केली आहे. भारतानेही मार्च महिन्यानंतर सलग पाच महिने अमेरिकी कर्जरोख्यांची विक्री केल्याचे समोर आले असून ऑगस्ट २०१८च्या अखेरीस भारताकडील अमेरिकी कर्जरोख्यांचे प्रमाण १४० अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले आहे. मार्च महिन्यात हेच प्रमाण १५७ अब्ज डॉलर्स होते.

चीन, जपान, भारत व तुर्कीबरोबर रशियानेही आपल्याकडील अमेरिकी कर्जरोख्यांची प्रचंड प्रमाणात विक्री केल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रशियाकडे जवळपास १०० अब्ज डॉलर्सचे अमेरिकी कर्जरोखे होते. मात्र गेले काही महिने सातत्याने अमेरिकी कर्जरोख्यांची विक्री सुरू असून आता हे प्रमाण शून्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या महिन्यात रशियाने आपली अमेरिकी डॉलर्समधील गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आणल्याचे सांगण्यात येत होते.

त्याचवेळी रशिया आपल्या राखीव गंगाजळीतील सोन्याचे साठे मोठ्या प्रमाणात वाढवित आहे. यावर्षी पहिल्या सात महिन्यात रशियाने १३० टनांहून अधिक सोने खरेदी केले आहे. त्यानंतरही रशियाची सोने खरेदी सुरू असली तरी त्याची निश्‍चित आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र रशियाने आपल्याकडील सोन्याचा राखीव साठा दोन हजार टनांजवळ नेल्याचे सांगण्यात येते. परकीय गंगाजळीत सोन्याच्या साठ्याचे प्रमाण विक्रमी १८ टक्क्यांवर गेल्याचेही उघड झाले आहे.

अमेरिकी डॉलरला हद्दपार करून सोन्यातील गुंतवणूक वाढविणे हा रशियाच्या अमेरिकाविरोधी धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी उघडपणे अमेरिकी डॉलरला आंतरराष्ट्रीय व्यापारातून हद्दपार करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी रशिया सहकारी देशांबरोबर स्थानिक चलनात व्यवहार करण्यावर भर देईल, असेही पुतिन यांनी बजावले होते. अमेरिकेकडून सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून हे प्रयत्न सुरू असून हा अमेरिकेविरोधातील आर्थिक युद्धाचा भाग असल्याचे संकेतही रशियन नेते व अधिकार्‍यांनी दिले आहेत.

English    मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info