कॅनबेरा/बीजिंग – दूरसंचार क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखण्यात येणार्या ‘५जी’ तंत्रज्ञानासाठी चिनी कंपन्यांना ऑस्ट्रेलियात प्रवेश देऊ नये, असा उघड इशारा ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर प्रमुखांनी दिला आहे. चिनी कंपन्याच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलियातील संवेदनशील व पायाभूत सुविधांची सुरक्षा कमकुवत असल्याचा दावा करून ‘ऑस्ट्रेलियन सिग्नल्स डिरेक्टरेट’चे प्रमुख माईक बर्गेस यांनी चीन सरकारच्या हस्तक्षेपावर थेट आक्षेप घेतला आहे. ऑस्ट्रेलियन अधिकार्यांच्या या आरोपामुळे ऑस्ट्रेलिया व चीनमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.
ऑस्ट्रेलिया व चीन हे परस्परांचे आघाडीचे व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतात. ऑस्ट्रेलियातील परकीय गुंतवणुकीतही चीनचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र गेल्या काही वर्षात चीनच्या ऑस्ट्रेलियातील वाढत्या प्रभावाबाबत सातत्याने नाराजीचा सूर उमटत असून सरकारनेही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः ‘साऊथ चायना सी’ व ‘आशिया-पॅसिफिक’मधील चीनच्या वाढत्या दादागिरीविरोधात ऑस्ट्रेलियाने आग्रही भूमिका घेतली आहे.
दुसर्या बाजूला देशातील शिक्षणसंस्था, खनिज क्षेत्र, मालमत्ता, शेती यासह राजकारणातील चीनचा हस्तक्षेप वाढत असल्याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. ऑस्ट्रेलिया सरकार, गुप्तचर विभाग व विविध अभ्यासगटांनी याबाबत प्रसिद्ध केलेले अहवाल चीनला थेट लक्ष्य करणारे असून राजकीय पक्षांसह जनतेतूनही मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने चीनबरोबरील संबंधांचा परखडपणे विचार करण्यास सुरुवात केली असून चिनी दबाव झुगारून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात ‘५जी’ तंत्रज्ञानाचा मुद्दा गाजत असून त्यात चिनी कंपन्यांचा सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे. चिनी कंपन्यांना प्रवेश मिळावा म्हणून ऑस्ट्रेलियातील काही गट तसेच राजकीय नेत्यांनी प्रभाव वापरण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र गुप्तचर विभागाच्या ठाम इशार्यामुळे सरकारला चिनी कंपन्यांची हकालपट्टी करणे भाग पडले होते. आता पुन्हा एकदा हा मुद्दा समोर येत असून चिनी कंपन्या ‘५जी’च्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुप्तचर प्रमुख माईक बर्गेस यांनी याला ठाम विरोध करीत चिनी कंपन्यांचा समावेश राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरू शकतो, असा उघड इशारा दिला आहे. त्यांच्या या इशार्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासगटाने, चिनी संशोधन व वैज्ञानिक आपली पार्श्वभूमी लपवून ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये संशोधन तसेच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठात संशोधन करणार्या तसेच शिकविण्यासाठी येणार्या अनेक चिनी संशोधकांचे चीन सरकार व लष्कराशी संबंध आहेत, असा आरोप अभ्यासगटाच्या अहवालात करण्यात आला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाबरोबरच अमेरिकेतही चिनी कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अमेरिका सरकारने चीन सरकारच्या ‘फुजिआन जिन्हुआ’ या कंपनीवर बंदी घातली असून अमेरिकी कंपन्यांनी त्याबरोबर व्यवहार करू नये, असा आदेश दिला आहे. या बंदीसाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे.
Englishया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |