अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील कारवाईत १०० तालिबानी ठार – अमेरिकेकडून ड्रोन हल्ले सुरू

अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील कारवाईत १०० तालिबानी ठार – अमेरिकेकडून ड्रोन हल्ले सुरू

लश्कर गाह – अमेरिका आणि अफगाणी लष्कराने गझनी, हेल्मंड आणि कंदहार प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानचे १०० हून अधिक दहशतवादी ठार केले असून यामध्ये तालिबानच्या वरिष्ठ कमांडरचा समावेश आहे. तालिबानने शांतीचर्चेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर अमेरिका व अफगाण सरकारने ही कारवाई केली. गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेने वेग धरला असून अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांचा वापर सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या लष्कराने पाकिस्तान सीमेजवळच्या प्रांतातील दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली आहे. अफगाणी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी हेल्मंड प्रांतात जोरदार हवाई हल्ले चढविण्यात आले. अमेरिकेच्या ड्रोन तसेच लढाऊ विमानांनी हेल्मंड प्रांतातील ‘नवझाद’ प्रांतात तुफानी हल्ले चढविले. अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यात हेल्मंड प्रांतातील तालिबानचा कमांडर ‘अब्दूल मनन’ ठार झाला असून तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने ही माहिती दिली. तर शांतीचर्चा हाच एकमेव पर्याय आहे, याची जाणीव करून देण्यासाठी अमेरिकेने तालिबानवरील हे हल्ले वाढविल्याचे अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते कर्नल डेव्ह बटलर यांनी ठणकावले.

हेल्मंड प्रांताप्रमाणे अमेरिका व अफगाणी लष्कराने कंदहार आणि गझ्नी या दोन प्रांतात तालिबानच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले. यापैकी गझ्नी प्रांतात ३५ तर कंदहार प्रांतात ३७ तालिबानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती अफगाणी लष्कराने दिली. गझ्नी प्रांतात अमेरिकेच्या लढाऊ विमानाने अन्दार, गेरू, देह याक, काराबाघ या भागात तर राजधानी गझनीजवळ हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये तालिबानचे अनेक तळ नष्ट झाल्याचे बोलले जाते. तर कंदहार प्रांतात एका वाहनावर झालेल्या हल्ल्यात तालिबानचे दहशतवादी ठार झाले. तालिबानने या दोन्ही हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानातील संघर्षात तालिबानला मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी सोसावी लागल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्यात अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये शांतीचर्चेसाठी प्रयत्न झाले होते. अफगाणिस्तानमधील राजकीय प्रवाहात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचेही तालिबानने स्पष्ट केले होते. पण अमेरिकेच्या पूर्ण माघारीशिवाय अफगाण सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे तालिबानने जाहीर केले होते. यानंतर अमेरिका व अफगाणिस्तानाने तालिबानवरील आपले हल्ले वाढविले आहेत.

तालिबानकडून ४० जणांचे अपहरण

काबुल – अफगाणिस्तानच्या समानगन प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी एका बसवर हल्ला चढवून ४० जणांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. तालिबानचे नियम मोडले म्हणून ही कारवाई केल्याचे बोलले जाते.

अफगाणी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, समानगन प्रांतातील ‘कुशक दारा’ भागात रविवारी सकाळी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला चढवून नागरिकांचे अपहरण केले. तालिबानच्या कैदेत असलेल्या ४० जणांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याची माहिती स्थानिक अफगाणी लष्करी अधिकार्‍याने दिली. गेल्या आठवड्यातही तालिबानी दहशतवाद्यांनी २५ जणांचे अपहरण केले होते.

 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info