लवकरच ‘तेल अविव’मध्ये पॅलेस्टिनींचे सरकार असेल – इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह खामेनी

लवकरच ‘तेल अविव’मध्ये पॅलेस्टिनींचे सरकार असेल – इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह खामेनी

 तेहरान – ‘‘गाझातील पॅलेस्टिनी कट्टरपंथीयांनी नुकत्याच झालेल्या संघर्षात इस्रायलला दिलेले प्रत्युत्तर म्हणजे इस्रायलच्या अंताची पूर्वसूचना आहे. पॅलेस्टिनींचा हा प्रतिकार भविष्यातील इस्रायलवरील निर्णायक विजयाची ग्वाही देणारा ठरेल. लवकरच ‘तेल अविव’मध्ये पॅलेस्टिनींचे सरकार असेल’’, अशी घोषणा इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह खामेनी यांनी केली. त्याचबरोबर या इस्रायलविरोधी संघर्षासाठी पॅलेस्टिनी जनता व ‘पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद’ या संघटनेला इराणचे कायम समर्थन असेल, असेही खामेनी यांनी जाहीर केले.

अमेरिका, युरोपिय महासंघ आणि इस्रायलने दहशतवादी संघटना म्हणून शिक्कामोर्तब केलेल्या ‘पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद’ (पीआयजे) या संघटनेचे प्रमुख ‘झईद अल-नखाला’ यांनी नुकतीच इराणला भेट दिली. यावेळी नखला यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची भेट घेतली. खामेनी यांनी ‘पीआयजे’च्या प्रमुखांशी बोलताना गाझापट्टीतील हमास व इतर दहशतवादी संघटनांनी इस्रायलविरोधात उभारलेल्या आघाडीची प्रशंसा केली. हमास, ‘पीआयजे’ व इतर संघटनांच्या कडव्या विरोधामुळे इस्रायल गुडघ्यावर आल्याचा दावा खामेनी यांनी केला. तसेच खामेनी यांनी इस्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या संघर्षांची आठवण करून दिली.

‘याआधीच्या दोन संघर्षात गाझातील सशस्त्र गटांनी इस्रायलला 22 आणि त्यानंतर आठ दिवसात संघर्षबंदी करण्यासाठी भाग पाडले होते. तर नुकत्याच झालेल्या संघर्षात इस्रायलने 48 तासात संघर्षबंदी जाहीर केली. याचा सरळ अर्थ, इस्रायलला गुडघ्यावर आले असा होतो’, असे खामेनी म्हणाले. ‘अरब देशांच्या लष्करलाही जे जमले नाही, ते पॅलेस्टिनी गटांनी करून दाखविले. पण हे छोटे विजय आहेत. भविष्यात पॅलेस्टिनींना मोठा विजय मिळवायचा आहे. तेल अविवमध्ये लवकरच पॅलेस्टिनींचे सरकार असेल’, असे सांगून इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याने ‘पीआयजे’ तसेच गाझातील इतर कट्टरपंथीयांना चिथावणी दिली.

वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींचे सरकार चालवित असलेल्या फताह या पक्षाने ‘जेरूसलेम’ ही पॅलेस्टाईनची राजधानी असेल आणि ‘तेल अविव’ ही इस्रायलची राजधानी असेल, अशी भूमिका स्वीकारली आहे. इतर अरब देशांची देखील हीच भूमिका आहे. पण इराण तसेच हिजबुल्लाह, हमास आणि ‘पीआयजे’ या दहशतवादी संघटनांनी इस्रायलचे अस्तित्वच नाकारले आहे. तसेच भविष्यात ‘तेल अविव’ देखील पॅलेस्टाईनच्या राजधानीचाच भाग असेल, असे जाहीर केले आहे.

खामेनी यांच्या पाठोपाठ ‘पीआयजे’प्रमुख नखाला यानेही इराणच्या समर्थनावर इस्रायलच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हल्ले चढविले जातील, असा इशारा दिला आहे. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह इस्रायलच्या उत्तरेकडील हल्ल्यांना सहाय्य करतील तर गाझातील कट्टरपंथी संघटना दक्षिण इस्रायलच्या प्रत्येक शहरांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करतील, अशी धमकी नखाला यांनी दिली आहे.

 English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info