तेहरान – ‘‘इस्लामचा ध्वज जगभरात फडकावा यासाठी इराणची जनता संघर्ष करीत आहे. जोवर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले ‘व्हाईट हाऊस’चे हुसैनिया अर्थात शिया इस्लामिक सेंटर बनत नाही, तोवर इराणची जनता अमेरिकेच्या विनाशाच्या घोषणा देतच राहील’’, असे इराणच्या सर्वोच्च धर्मगुरुंचे निकटवर्तीय असलेल्या आयातुल्ला ‘लोत्फोल्ला देझ्खाम’ यांनी म्हटले आहे.
इराणमधील राजकीय रचनेनुसार या देशात संपूर्ण अधिकार सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या आयातुल्लाह खामेनी यांच्याकडे एकवटलेले आहेत. खामेनी यांचे निकटवर्तीय व प्रतिनिधी असलेल्या आयातुल्ला ‘लोत्फोल्ला देझ्खाम’ यांनी केलेल्या या विधानांना फार मोठे महत्त्व आले आहे. इस्लामधर्माचा ध्वज सार्या जगात फडकून आमचे तारणहार असलेल्या इमाम महदी यांचे राज्य सार्या जगावर पसरेल, अशी इराणच्या जनतेची ठाम धारणा आहे. यासाठीच इराणची जनता अथकपणे संघर्ष करीत आहे, असा दावा देझ्खाम यांनी केला.
यामुळे इराणचे शत्रू भयभीत झाले आहेत. या भयामुळेच अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लादले आहेत. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इराणची भीती वाटली नसती, तर त्यांनी इराणला आपले इंधन विकण्यापासून रोखले नसते. इराणच्या जनतेच्या गर्जनेमुळे जागतिक शक्ती धास्तावलेली आहे, असा दावा देझ्खाम यांनी केला. पण आपले तारणहार असलेले इमाम महदी अवतरून त्यांचे राज्य सार्या जगावर प्रस्थापित झाल्याखेरीज व व्हाईट हाऊसचे रुपांतर हुसैनिया अर्थात शिया इस्लामिक सेंटरमध्ये झाल्याखेरीज इराणची जनता अमेरिकेच्या विनाशाच्या घोषणा देण्याचे थांबविणार नाही, असे देझ्खाम पुढे म्हणाले.
त्यांच्या या वादग्रस्त भाषणानंतर उपस्थितांनी अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्याचे वृत्त आहे. याआधीही इराणच्या नेत्यांनी इस्रायल तसेच अमेरिकेच्या विरोधात जहाल भाषणे ठोकली होती. पण देझ्खाम यांचे हे उद्गार इराण व अमेरिकेमधील संघर्ष भडकण्याच्या स्थितीत असताना, अतिशय स्फोटक ठरत आहेत.
इस्रायलचे काही नेते सिरियातील इराणच्या कारवाया रोखण्यासाठी थेट इराणवरच हल्ला चढविण्याचे प्रस्ताव देत आहेत. तर सिरियावरील इस्रायलचे हल्ले थांबवायचे असतील, तर इस्रायलवर हल्ले चढविणे भाग आहे, असा निष्कर्ष इराणचे लष्करी अधिकारी मांडत आहेत. त्याचवेळी अमेरिका देखील इराणवरील लष्करी कारवाईचा पर्याय सोडून दिलेला नाही, याची आठवण करून देत आहे. तसेच इराणवरील निर्बंधांच्या विरोधात जाऊन युरोपिय देशांनी इराणशी व्यवहार केला, तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असा बडगा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उगारला आहे.
यामुळे आधीच प्रचंड दबावाखाली असलेली इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह खामेनी यांच्या प्रतिनिधींनी अमेरिकेच्या विरोधात दिलेला हा इशारा आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |