वर्षभरात जागतिक मंदीचा जबरदस्त फटका बसेल – नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांचा इशारा

वर्षभरात जागतिक मंदीचा जबरदस्त फटका बसेल – नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांचा इशारा

दुबई – अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध समस्यांवर आंतरराष्ट्रीय समुदायाने आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत. ही बाब नव्या जागतिक मंदीला आमंत्रण देईल, असा इशारा नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांनी दिला. त्याचवेळी सध्या युरोपिय महासंघाला मंदीचा सर्वात मोठा धोका असल्याचा दावाही क्रुगमन यांनी केला. गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यासारख्या आघाडीच्या वित्तसंस्थांसह अनेक गटांनी मंदीचे संकेत दिले असून क्रुगमन यांचा इशारा त्याला दुजोरा देणारा ठरतो.

दुबईमध्ये झालेल्या ‘वर्ल्ड गव्हर्मेंट समिट’मध्ये क्रुगमन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशारा दिला. ‘नव्या आर्थिक मंदीसाठी एक विशिष्ट घटकच कारणीभूत ठरेल, असे नाही. अर्थक्षेत्रातील विविध घटक मंदीचे कारण ठरु शकतात. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करांमध्ये कपात करण्याबाबत घेतलेला निर्णय फारसा प्रभावी ठरलेला नाही’, याकडे क्रुगमन यांनी लक्ष वेधले.

मात्र त्याचवेळी अर्थव्यवस्थेतील संकटांवर योग्य त्या उपाययोजना न करण्याचा मुद्दा हा या मंदीसाठी महत्त्वाचा घटक ठरेल, असे क्रुगमन यांनी बजावले आहे. बँकांकडून व्याजदरात सातत्याने करण्यात आलेली वाढ ही अतिशय वाईट कल्पना असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. मात्र नवी मंदी २००८ सालाप्रमाणे मोठी नसेल, अशी अपेक्षा पॉल क्रुगमन यांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसतील व अर्थव्यवस्था हाताळणार्‍यांना त्याला योग्य रितीने तोंड देता येणार नाही, अशी चिंता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली.

क्रुगमन यांच्यापूर्वी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ पीटर शीफ तसेच ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनीही आर्थिक मंदीबाबत गंभीर इशारे दिले होते. जागतिक पातळीवर दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक मंदीची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला असून जग निद्रिस्तावस्थेत नव्या आर्थिक संकटाच्या दिशेने पावले टाकत असल्याचा इशारा ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी गेल्या वर्षी दिला होता.

तर, २००८ साली कोसळलेल्या आर्थिक संकटानंतर जगाने काहीही धडा घेतलेला नसल्याने भयंकर आर्थिक संकट लवकरच कोसळणार असून अमेरिकी डॉलरच्या अपयशामुळे यावेळची अवस्था अधिक भयावह असेल, असे अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार पीटर शीफ यांनी बजावले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info