‘ओआयसी’मध्ये भारताला विरोध करणारा पाकिस्तान तोंडघशी

‘ओआयसी’मध्ये भारताला विरोध करणारा पाकिस्तान तोंडघशी

अबू धाबी – ५७ सदस्यदेश असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ने (ओआयसी) भारताला दिलेले आमंत्रण मागे घ्यावे, अशी मागणी करणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ओआयसी’मध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळता कामा नये, यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बहिष्काराचीही धमकी दिली होती. त्याची पर्वा न करता ‘ओआयसी’ने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दिलेले आमंत्रण कायम ठेवले. यामुळे भारताची कोंडी करू पाहणार्‍या पाकिस्तानचीच या परिषदेत नाचक्की झाली. थेट नामोल्लेख न करता, परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी आपल्या ‘ओआयसी’मधील भाषणात पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर घणाघाती प्रहार केले.

‘दहशतवादामुळे कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. दहशतवादामुळे क्षेत्रात अराजक माजते. याने सारे जग धोक्यात येते’, असे सांगून परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी ‘ओआयसी’मधील आपल्या १७ मिनिटांच्या भाषणात दहशतवाद व कट्टरवादावर सडकून टीका केली. ‘दहशतवाद व कट्टरवादाचा वेगवेगळ्या मार्गाने पुरस्कार केला जातो. पण तसे करणारे धर्माची विकृत पद्धतीने मांडणी करतात. धर्माचा आधार घेऊन दहशतवादाचे समर्थन करता येऊ शकत नाही’, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या परिषदेत ठासून सांगितले. आपण १३० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन इथे आलो असून भारतात १८.५ कोटी इस्लामधर्मिय बंधूभगिनींचे वास्तव्य आहे, याचीही आठवण परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी करून दिली आहे.

‘ओआयसी’मधील परराष्ट्रमंत्री स्वराज यांचे हे भाषण ऐतिहासिक ठरले आहे. विशेषतः त्यांचे हे भाषण सुरू असताना, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची रिकामी असलेली खुर्ची भारतीय वृत्तवाहिन्यांमार्फत सातत्याने दाखविली जात होती. ‘ओआयसी’मध्ये सहभागी होण्याची संधी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना मिळता कामा नये, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. २६ फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानच्या ‘बालाकोट’ येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला चढविला होता. हा हवाई हल्ला म्हणजे पाकिस्तानवरचे आक्रमण ठरते. ‘ओआयसी’ने याचा निषेध करण्यासाठी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिलेले आमंत्रण मागे घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केली होती. तसे केले नाही, तर या परिषदेवर पाकिस्तान बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही कुरेशी यांनी दिला होता.
भारत हा इस्लामधर्मिय देश नसून तो ‘ओआयसी’चा सदस्य किंवा निरिक्षक देशही नाही. त्यामुळे इथे भारताला आमंत्रण देण्याचे काहीच कारण नाही, असा दावा पाकिस्तानातून केला जात होता. मात्र ‘ओआयसी’च्या इतर सदस्यदेशांनी पाकिस्तानच्या या इशार्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाज झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या परिषदेत उपस्थित राहण्याचे टाळले.

हा भारताचा आणखी एक राजनैतिक विजय ठरतो. इस्लामधर्मिय देशांनी पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याचे टाळले असून ‘ओआयसी’मध्ये पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडल्याचे चित्र दिसत होती. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या संसदेत बोलताना ही खंत व्यक्त केली. इस्लामधर्मिय देशांसाठी पाकिस्तान युद्धात उतरला होता. पण या देशांना पाकिस्तानची कदर नाही, उलट त्यांना भारत जवळचा वाटतो, अशी टीका पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत.

‘मतभेदानंतरही पाकिस्तानने या परिषदेत सहभागी व्हायला हवे होते. ज्या देशांकडे पाकिस्तान हातात कटोरा घेऊन भीक मागत आहे, असे देश पाकिस्तानची कुुठलीही मागणी गंभीरपणे घेणार नाहीत. त्यापेक्षा फार मोठा आर्थिक व राजकीय प्रभाव असलेल्या भारतालाच इस्लामी देश अधिक महत्त्व देतील. हे सत्य आपल्या सरकारने स्वीकारावे व त्यानुसार धोरणे आखावी’, असे पाकिस्तानच्या काही लोकप्रतिनिधी व विश्‍लेषकांनी म्हटले आहे. तसेच भारताबरोबर युद्ध झाले तर इस्लामधर्मिय देश आपल्या मागे उभे राहणार नाहीत, याचे भान पाकिस्तानने ठेवावी, असेही पाकिस्तानचे जबाबदार पत्रकार सांगत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info