हुकुमशहा बशिर यांच्या हकालपट्टीनंतर सुदान प्रमुख देशांमधल्या संघर्षाची रणभूमी बनेल – विश्‍लेषकांचा दावा

हुकुमशहा बशिर यांच्या हकालपट्टीनंतर सुदान प्रमुख देशांमधल्या संघर्षाची रणभूमी बनेल – विश्‍लेषकांचा दावा

खार्तुम/रियाध – तब्बल तीन दशके सुदानवर एकछत्री अंमल गाजविणार्‍या ‘ओमर अल-बशिर’ यांची हकालपट्टी झाल्यानंतर राजधानी खार्तुममध्ये अद्यापही तीव्र निदर्शने सुरू आहेत. सध्या सुदानची सूत्रे लष्करी कौन्सिलच्या हातात असून हे कौन्सिल बरखास्त करण्याची मागणी निदर्शकांनी केली आहे. मात्र याबाबत निदर्शक व कौन्सिलमध्ये सुरू असणार्‍या चर्चेला अद्याप यश मिळाले नसून त्याचा फायदा इतर देश उचलू शकतात, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

आखातात सध्या सौदी अरेबिया, युएई व इजिप्त आणि इराण-कतार-तुर्की असे दोन गट सक्रिय असून सुदान या गटांच्या सत्तासंघर्षाला बळी पडेल, असे संकेत विश्‍लेषक तसेच परदेशी प्रसारमाध्यमांकडून देण्यात येत आहेत. सौदी अरेबियाच्या येमेन संघर्षाला सहाय्य करणारे ओमर बशिर हे गेल्या वर्षभरात कतार व तुर्कीच्या बाजूला झुकत असल्याचे संकेत मिळत होते.

बशिर यांचा कल बदलल्यामुळेच सौदी अरेबिया व सहकारी देशांनी सुदानमधील त्यांची राजवट उलथवली, असे दावे काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. सुदान हा ‘अरब स्प्रिंग-२’ चा भाग ठरेल, असेही सांगण्यात येत होते. बशिर यांच्यानंतर सत्तेची सूत्रे ताब्यात घेणार्‍या लष्कराला सौदी अरेबिया, युएई व इजिप्त गटाचे समर्थन आहे.

आफ्रिका महासंघाच्या बैठकीत इजिप्तने ‘सुदान’चा उपस्थित केलेला मुद्दा आणि त्यापूर्वी सौदी अरेबिया व ‘संयुक्त अरब अमिराती’ने (युएई) तब्बल तीन अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची केलेली घोषणा याच समर्थनाचा भाग होता. या दोन देशांपाठोपाठ कुवैतनेही सुदानला आर्थिक निधी देण्याचे जाहीर केले होते. सुदानची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे सहाय्य करण्यात आल्याचे दावे संबंधित देशांकडून करण्यात आले होते.

मात्र या अर्थसहाय्यापूर्वी माजी हुकुमशहा बशिर यांनीही कतार तसेच तुर्कीकडून अर्थसहाय्य मिळविण्याचे प्रयत्न केले होते. बशिर यांच्याविरोधात सुरू असणारे आंदोलन मोडण्यासाठी तसेच त्यांची राजवट स्थिर राखण्यासाठी इराणच्या राजवटीनेही मदत केली होती. त्यांची सत्ता उलथल्यानंतरही निदर्शने सुरू ठेवण्यामागे इराणसह कतार व तुर्कीचा हात असावा, अशी शंका परदेशी विश्‍लेषक व प्रसारमाध्यमांकडून व्यक्त होत आहे. बशिर यांची सत्ता उलथल्यानंतर सुरू राहिलेल्या निदर्शनांमध्ये इजिप्तच्या दूतावासाबाहेरही जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या, याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

सध्या सिरिया, येमेन तसेच लिबियामध्ये सौदी व सहकारी देश आणि इराण-तुर्की व मित्रदेश यांचा उघड संघर्ष सुरू आहे. सुदानमधील घटनाक्रमही त्याच दिशेने जाण्याचे संकेत मिळत असून आफ्रिकेत नव्या दीर्घकालिन सत्तासंघर्षाला सुरुवात होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info