वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाच्या ‘टीयू-१५४एम’ या विमानाने अमेरिकेच्या नेवाडा प्रांतातील ‘एरिआ-५१’सह कॅलिफोर्नियातील हवाईतळ तसेच आण्विक तळांची पाहणी केल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते एरिक पॅहोन यांनी ही माहिती दिली. ‘ट्रिटी ऑन ओपन स्काईज्’ या आंतरराष्ट्रीय करारानुसार ही टेहळणी मोहीम पार पडल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. ‘आयएनएफ’ या अण्वस्त्रकरारावरून दोन देशांमधील तणाव चिघळत असतानाच पार पडलेली ही मोहीम लक्ष वेधून घेणारी ठरते.
अमेरिकेतील ‘द ड्राईव्ह’ या वेबसाईटने रशियन विमानाच्या मोहीमेची माहिती देणारे वृत्त प्रसिद्ध केले. त्यात, गेल्या आठवड्यात रशियाच्या ‘टीयू-१५४एम’ या विमानाने अमेरिकेतील संरक्षणतळांची टेहळणी केली, असे सांगण्यात आले आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील ‘ट्रॅव्हिस एअरफोर्स बेस’पासून ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर रशियन विमानाने ‘एडवर्डस् एअरफोर्स बेस’, ‘फोर्ट आयर्विन ट्रेनिंग सेंटर’, ‘क्रीच एअरफोर्स बेस’, ‘युक्का फ्लॅट न्यूक्लिअर टेस्ट रिजन’, ‘टोनोपाह टेस्ट रेंज’ व ‘डगवे प्रुव्हिंग ग्राऊंड’ या भागांवरून उड्डाण केल्याचा दावा करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान रशियन विमानाने ‘एडवर्डस् एअरफोर्स बेस’चा भाग असणार्या नेवाडा प्रांतातील विवादित ‘एरिआ ५१’ या भागावरूनही उड्डाण केल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ‘एरिआ ५१’ हा अमेरिकी संरक्षण विभागाच्या ‘गोपनीय व सुरक्षित क्षेत्र’ प्रकारात मोडणारा भाग असल्याचे सांगण्यात येते.
२०१३ साली संरक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या भागात प्रगत तसेच प्रायोगिक विमानांच्या चाचण्या घेण्यात येतात. या चाचण्यांसंदर्भातील सर्वच माहिती ‘गोपनीय’ प्रकारातील असून ती उघड करण्यात आलेली नाही. काही अभ्यासक व तज्ज्ञांच्या दाव्यानुसार ‘एरिआ ५१’मध्ये परग्रहवासियांवर संशोधन करण्यात येत असल्याने तो भाग संरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र अमेरिकी संरक्षणदलाने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियन विमानाने आपल्या टेहळणी मोहिमेदरम्यान फोटोग्राफ्स अथवा व्हिडिओ घेतले आहेत किंवा नाही याची कोणत्याही प्रकारची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मोहिमेपूर्वी अमेरिकेने रशियन विमानाची तपासणी केली होती, तसेच मोहिमेवर अमेरिकेची नजर होती, असे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
‘ट्रिटी ऑन ओपन स्काईज्’नुसार रशियाने यावर्षी अमेरिकी तळांची टेहळणी करण्याची यावर्षातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अमेरिकेने गेल्या महिन्यात रशियाच्या तळांची टेहळणी पार पाडल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०१७ नंतर ‘ट्रिटी ऑन ओपन स्काईज्’नुसार परस्परांच्या लष्करी तळाची सलग महिन्यात टेहळणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिका व रशियाच्या न्यूक्लिअर बॉम्बर्सनी एकाच वेळी युरोपच्या हवाईहद्दीत सराव केल्याची माहिती समोर आली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |