वॉशिंग्टन – इराण हा केवळ दहशतवाद पसरविणारा देश नाही. तर या देशाचे ‘रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी) हे लष्करी पथक उघडपणे दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. इराणचे हेतू साध्य करण्यासाठी ‘आयआरजीसी’कडून दहशतवादाचा वापर केला जातो, याची खात्री अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला पटलेली आहे. म्हणूनच अमेरिका ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ला दहशतवादी संघटना घोषित करीत आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. सोशल मीडियावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेनंतर जगभरात खळबळ माजली. अशारितीने कुठल्याही देशाच्या लष्करी गटाला दहशतवादी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीत आहेत.
अमेरिकेने याआधीच ‘आयआरजीसी’शी संबंधित संघटना, कंपन्या तसेच या लष्करी पथकातील व्यक्तींना काळ्या यादीत टाकले होते. पण इराणच्या लष्करातील आघाडीचे लष्करी पथक म्हणून ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ला दहशतवादी संघटना जाहीर करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरोधातील कारवाई तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले. ‘आयआरजीसी’वरील निर्बंधांची तयारी अमेरिकेने याआधीच केली होती, असेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. यापुढे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड आणि पर्यायाने इराणवर आर्थिक दबाव वाढविण्यात येईल, अशी माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली.
तर या निर्णयामुळे ‘रिव्होल्युशनरी गार्ड’शी कुठल्याही प्रकारचे व्यवहार ठेवणे किंवा या लष्करी गटाचे समर्थन करणे यापुढे अमेरिका खपवून घेणार नाही, हा सुस्पष्ट संदेश यातून नक्कीच पोहोचला असेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. ‘रिव्होल्युशनरी गार्ड’शी व्यवहार करणे म्हणजे दहशतवादाला खतपाणी पोहोचविण्यासारखे आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या गटाच्या संपर्कात असलेल्या युरोपिय तसेच आशियातील कंपन्यांना समज दिली. अमेरिकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम ‘रिव्होल्युशनरी गार्ड’शी संलग्न असलेल्या इराक आणि लेबेनॉनमधील गटांवर होऊ शकतो, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी पत्रकारांशी बोलताना येत्या आठवड्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. ‘‘इराणची ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ लष्करी गट असल्याचे सोंग घेऊन गेली ४० वर्षे दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे. या गटाने जगभरात दहशतवादी संघटना उभारुन कारवाया सुरू ठेवल्या. सिरिया, इराक, येमेन आणि आखातातील इतर देशांमधील अस्थैर्यासाठी देखील ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ जबाबदार आहे’’, असा ठपका परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी ठेवला. तर सर्व प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे इराणसाठी नियुक्त केलेले अमेरिकेचे विशेषदूत ब्रायन हूक यांनी सांगितले.
दरम्यान, या निर्णयामुळे ‘रिव्होल्युशनरी गार्ड’शी संबंधित सिरिया, इराक आणि लेबेनॉनमधील गटांवरील अमेरिकेच्या कारवाईची शक्यता वाढली आहे.
इराणच्या ‘रियाल’ची मोठी घसरण
‘रिव्होल्युशनरी गार्ड’ला दहशतवादी संघटना जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर झाला. याने इराणचे चलन ‘रियाल’चे मूल्य साडे सात टक्क्यांनी घसरले आहे.
रविवारपर्यंत एका डॉलरसाठी एक लाख ३३ हजार इराणी रियाल मोजावे लागत होते. पण अमेरिकेच्या निर्णयानंतर एका डॉलर्समागे एक लाख ३४ हजार रियाल मोजावे लागत असून येत्या काळात इराणमधील महागाई भयावहरित्या वाढणार असल्याची चिंता इराणमधील विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |