दुबई – अमेरिकेसाठी इंधन वाहून नेण्याच्या तयारीत असलेल्या सौदी अरेबियाच्या दोन टँकर्सवर घातपाती हल्ला झाला आहे. ‘संयुक्त अरब अमिरात’च्या (युएई) किनार्याजवळ हा हल्ला झाल्याची माहिती सौदी अरेबियाचे इंधनमंत्री ‘खालिद अल-फलिह’ यांनी दिली. अमेरिकेच्या निर्बंधांवर टीका करून सौदी व अरब मित्रदेशांचे इंधन पर्शियन आखातातून बाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी देणारा इराण या घातपातामागे असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. या घातपाताचे रुपांतर मोठ्या संघर्षात होण्याची भीती पाश्चिमात्य देश व्यक्त करू लागले आहेत.
रविवारी सकाळी सहा वाजता ‘संयुक्त अरब अमिरात’च्या (युएई) ‘फुजैरा’ बंदराजवळ स्फोट झाले होते. ‘युएई’च्या सरकारने याविषयी माहिती प्रसिद्ध करण्याआधीच ‘युएई’च्या सर्वात व्यस्त बंदरात मोठे स्फोट झाल्याची बातमी इराणी आणि लेबेनीज माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. ‘युएई’ने हे वृत्त नाकारून फुजैरा बंदरात नव्हे तर या बंदरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या चार इंधनवाहू जहाजांवर स्फोट झाल्याचे स्पष्ट केले. यातील दोन जहाजे सौदीची होती. अमेरिकेसाठी इंधन भरून नेण्यासाठी ही जहाजे येथील सागरी क्षेत्रात उभी होती, त्यावेळी हा स्फोट झाला.
हा घातपाती हल्ला होता, असे सौदी तसेच युएई’ने म्हटले आहे. या घातपातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, तसेच इंधनाचेही नुकसान झालेले नाही. पण सौदीच्या जहाजांचे मोठे नुकसान झाल्याचे इंधनमंत्री फलिह यांनी सांगितले. सौदी व युएई’ने या हल्ल्यासाठी कुणावरही थेट आरोप करण्याचे टाळले आहे. तसेच या हल्ल्याची चौकशी सुरू असल्याचे इंधनमंत्री फलिह म्हणाले. पण सौदीसह चार जहाजांवरील घातपाती हल्ल्यासाठी इराण जबाबदार असल्याचा दाट संशय आखाती देश, विश्लेषक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी अशाप्रकारच्या घातपाताचा इशारा दिला होत.
अमेरिकेने इराणवर टाकलेले नवे कठोर निर्बंध तसेच या सागरी क्षेत्रात ‘युएसएस अब्राहम लिंकन’ विमानवाहू युद्धनौकेसह ‘बी-५२’ बॉम्बर्स विमाने, पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा या क्षेत्रात तैनात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या तैनातीवर खवळलेल्या इराणने विमानवाहू युद्धनौकेसह आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. इराणच्या इंधनाची निर्यात होणार नसेल तर पर्शियन आखातातून कुठल्याही अरब देशाचे इंधन बाहेर पडू देणार नसल्याचे इराणने बजावले होते.
त्यानंतर इराण तसेच इराणसमर्थक गट पर्शियन आखातातील इंधनाच्या निर्यातीवर हल्ले चढवतील, असे सांगून अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी सौदी व आखातातील अरब मित्रदेशांना इराणच्या हल्ल्यापासून सावध केले होते. इस्रायलच्या वृत्तवाहिनीने इराणच्या सौदीवरील हल्ल्यांचा इशारा प्रसिद्ध केला होता. त्यामुळे सौदीच्या जहाजांवरील घातपातामागे इराण असल्याचे बोलले जाते.
पण सौदीच्या जहाजांवरील हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचा खुलासा इराण करीत आहे. अमेरिका व मित्रदेशांच्या इराणविरोधी कटाचा हा एक भाग असल्याचा ठपका इराणच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मुसावी यांनी ठेवला. दरम्यान, सौदीच्या इंधनवाहू जहाजावरील या घातपाती हल्ल्यामुळे अमेरिका व इराणमध्ये संघर्ष पेट घेईल, अशी चिंता ब्रिटनने व्यक्त केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |