‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने विकसित केलेल्या ‘हॅकिंग टूल’चा वापर करून अमेरिकेच्या ‘बाल्टिमोर’ शहरावर सायबरहल्ला – तीन आठवडे प्रशासकीय यंत्रणा ओलिस

‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने विकसित केलेल्या ‘हॅकिंग टूल’चा वापर करून अमेरिकेच्या ‘बाल्टिमोर’ शहरावर सायबरहल्ला – तीन आठवडे प्रशासकीय यंत्रणा ओलिस

बाल्टिमोर/वॉशिंग्टन, दि. २६ (वृत्तसंस्था) – अमेरिकेच्या मेरीलॅण्ड प्रांतातील ‘बाल्टिमोर’ शहरावर करण्यात आलेल्या सायबरहल्ल्यात शहराची प्रशासकीय यंत्रणा तब्बल तीन आठवडे वेठिस धरण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. सायबरहल्ला करणार्‍या हॅकर्सनी तब्बल एक लाख डॉलर्स ‘बिटकॉईन्स’ रुपात खंडणी मागितली असून स्थानिक यंत्रणांनी त्यास नकार दिला. ‘बाल्टिमोर’वरील या हल्ल्यासाठी अमेरिकेच्याच ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने विकसित केलेले ‘इटर्नल ब्ल्यू’ नावाचे ‘हॅकिंग टूल’ वापरण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली.

७ मे रोजी बाल्टिमोर शहराच्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठा सायबरहल्ला करण्यात आला. या हल्ल्याने शहराच्या प्रशासनाकडून वापरण्यात येणारे संपूर्ण ‘कॉम्प्युटर नेटवर्क’ बंद पडले. प्रशासनाकडून शहरातील लाखो नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. यात पाणी, आरोग्य, मालमत्ता यासारख्या विविध विभागांमधील सेवांचा समावेश आहे. संपूर्ण नेटवर्क बंद पाडल्यानंतर एका संदेशाद्वारे एक लाख डॉलर्स मूल्याची ‘बिटकॉईन’ खंडणी म्हणून जमा करण्याची धमकी प्रशासनाला देण्यात आली.

मात्र हॅकर्सनी दिलेल्या धमकीपुढे झुकण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे शहरातील प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले असून लाखो नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले. शहरातील ‘आयटी’ विभागाकडून नागरिकांना स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असले तरी त्याला पूर्ण यश मिळालेले नाही. त्यामुळे स्थानिक जनतेतील असंतोष वाढत असून लोकप्रतिनिधींनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहराचे प्रशासन ओलिस धरणार्‍या या सायबरहल्ल्यासाठी अमेरिकेचीच गुप्तचर यंत्रणा म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने तयार केलेले ‘इटर्नल ब्ल्यू’ नावाचे ‘हॅकिंग टूल’ वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिले असून त्यात गेल्या वर्षी टेक्सासमध्ये झालेल्या एका सायबरहल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. टेक्सास प्रांतातील ‘सॅन अँटोनिओ’ नावाच्या शहरातील प्रशासनावरही याच प्रकारे सायबरहल्ला चढविण्यात आला होता.

‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने विकसित केलेले ‘इटर्नल ब्ल्यू’ हे ‘हॅकिंग टूल’ सुरुवातीच्या काळात ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या ‘विंडोज’ या ऑपरेटिंग सिस्टिममधील दोषांचा फायदा उचलण्यासाठी वापरण्यात येत होते. मात्र २०१७ साली ‘शॅडो ब्रोकर्स’ नावाच्या हॅकर्सच्या गटाने ‘इटर्नल ब्ल्यू’ इंटरनेटवर उपलब्ध करून दिले. त्यानंतर जगभरात झालेल्या ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ल्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असून ‘बाल्टिमोर’ हे त्याचे ताजे उदाहरण ठरले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info