वॉशिंग्टन – ‘जी२०’ बैठकीत चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत करार न झाल्यास अमेरिका चीनच्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लादेल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. चीनची अर्थव्यवस्था गाळात चालली असल्याने त्यांना व्यापारी करार करण्याची इच्छा आहे, अशी पुस्तीही ट्रम्प यांनी पुढे जोडली. चीनने ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी जपानमधील ‘जी२०’च्या बैठकीत दोन्ही देशांचे नेते सध्या समोर असणार्या समस्यांवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतील, असे संकेत दिले आहेत.
काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर लादलेल्या करात २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. त्याचवेळी ‘चीनने आता जर व्यापारी करार केला नाही तर २०२० सालानंतर त्यांना त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील’, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनला बजावले होते. मात्र अमेरिका चीनबरोबरील व्यापारी चर्चेत एकतर्फी भूमिका घेत असून चीनच्या मागण्यांचा विचार केला जात नाही, असा तक्रारीचा सूर चिनी राजवटीकडून उमटला होता. त्याचवेळी चीनकडून अमेरिकी कंपन्यांवर कारवाईचा तसेच ‘रेअर अर्थ मिनरल्स’ची निर्यात रोखण्याचाही इशारा देण्यात आला होता.
मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या इशार्यांकडे दुर्लक्ष करून व्यापारी करार अमेरिकेच्याच हिताचा असेल, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात ‘जी२०’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली नवी धमकी या आक्रमकतेत अधिक भर घालणारी दिसत आहे. ट्रम्प यांनी यावेळी चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण सुरू असल्याचा दावा करीत अमेरिकेची बाजू मजबूत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चीनला करार करावाच लागेल, असे संकेतही त्यांनी दिले. करार नाही झाला तर चीनच्या उत्पादनांवर अतिरिक्त कराची धमकी देऊन ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाची तीव्रता अधिकच वाढविली आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी चीनच्या उत्पादनांबाबत दिलेल्या धमक्या खर्या केल्या असून नवी धमकीही लवकरच अमलात आणली जाईल, असे दिसत आहे. अमेरिका व चीनमध्ये गेल्या वर्षापासून जोरदार व्यापारयुद्ध सुरू असून त्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक महिने चर्चाही सुरू होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस व्यापारयुद्ध ९० दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात अमेरिका व चीन वाटाघाटींना सुरुवात झाली होती. मात्र चीन अटी मान्य करीत नसल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली. चीनने अमेरिकेच्या आक्रमकतेपुढे झुकण्याचे नाकारल्याने चर्चा फिस्कटली होती.
आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम हळूहळू समोर येऊ लागले असून इतर देशांच्या उत्पादन तसेच व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. जपानमध्ये होणार्या ‘जी२०’च्या बैठकीत हा मुद्दा प्राधान्याने चर्चिला जाईल, असे संकेत जपानसह इतर देशांच्या नेत्यांनी दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |