कॅनबेरा – ‘आर्थिक उदारीकरणातून चीनमध्ये लोकशाही येईल व असा चीन आपल्यासाठी सुरक्षित असेल, असा काही पाश्चात्यांचा समज होता. १९४०च्या दशकात पोलाद व काँक्रिटची तटबंदी उभारणार्या फ्रान्सलाही अशाच प्रकारे आपण जर्मनीविरोधात सुरक्षित असल्याचे वाटले होते. मात्र त्यांना या चुकीच्या विचारांची भयंकर किंमत मोजावी लागली. वेगाच्या जोरावर लढल्या जाणार्या युद्धाची जाणीव फ्रान्सला त्यावेळी झालीच नाही आणि आजच्या घडीलाही ऑस्ट्रेलिया आपल्या हुकुमशाही वृत्तीच्या शेजार्याचे इरादे ओळखण्यात असाच अपयशी ठरला आहे’, अशा घणाघाती शब्दात ऑस्ट्रेलियाचे संसद सदस्य अँडय्रू हॅस्टि यांनी चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेबाबत खळबळजनक इशारा दिला.
गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाने चीनच्या महत्त्वाकांक्षेविरोधात उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान माल्कम टर्नबूल व त्यानंतर विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनचे दडपण झुगारून कम्युनिस्ट राजवटीच्या धोरणांना आव्हान दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे चीन नाराज असून ऑस्ट्रेलियाला व्यापारी व आर्थिक मुद्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनने ऑस्ट्रलियाच्या अनेक क्षेत्रांमध्ये घुसखोरी केल्याचे समोर येत असून त्याविरोधात देशातील विविध अभ्यासगट, विश्लेषक, तज्ज्ञ तसेच संसद सदस्यही आवाज उठवू लागले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे संसद सदस्य असणारे अँडय्रू हॅस्टि हे संसदेतील ‘इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी कमिटी’चे प्रमुख आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या दैनिकात लेख लिहिला असून त्यात चीनची राक्षसी महत्त्वाकांक्षा व ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील लष्करीकरण याकडे लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियाचा बुद्धिवादी व विचारवंताचा वर्ग अपयशी ठरला असून त्यामुळे देशातील संस्था व यंत्रणा कमकुवत झाल्याचा दावा हॅस्टि यांनी केला. चीनच्या महत्त्वाकांक्षेपुढे ऑस्ट्रेलिया ठामपणे उभा राहिला नाही तर ऑस्ट्रेलियाला स्वातंत्र्य व सार्वभौमत्त्व गमवावे लागेल, असा खरमरीत इशारा त्यांनी दिला.
चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची दुसर्या महायुद्धातील जर्मनीशी तुलना करताना ऑस्ट्रेलियाच्या संसद सदस्यांनी चीनच्या कारवायांमागे ‘विचारसरणी’ हा घटक महत्त्वाचा असल्याची जाणीवही करून दिली. चीनच्या धोरणांमागे असलेल्या विचारसरणीकडे पाश्चात्य दुर्लक्ष करीत असल्याचा दावा हॅस्टि यांनी केला. त्याचवेळी सध्याचा काळ ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील निर्णायक टप्पा असून येणार्या दशकात आपली लोकशाही मूल्ये, अर्थव्यवस्था व सुरक्षेचा कस लागणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियन संसद सदस्यांच्या या विखारी टीकेवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
ऑस्ट्रेलियन संसद सदस्य अँडय्रू हॅस्टि यांची ‘चीनचा धोका’ हा मुद्दा पुढे करून केलेली ओरड शीतयुद्धकालिन मानसिकतेचे प्रतीक आहे, अशा शब्दात चीनच्या दूतावासाने फटकारले. जग शांतता, सहकार्य व विकासाकडे कल दाखवित असताना हॅस्टि यांचे विचार त्याच्या विरोधात जाणारे असून त्याने ऑस्ट्रेलिया-चीन संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे दूतावासाकडून देण्यात आलेल्या निवेदनात बजावण्यात आले आहे. चीनचा विकास जगासाठी धोका नसून एक संधी आहे हे येणारा काळ दाखवून देईल, असेही चीनने म्हटले आहे.
गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ विश्लेषक ‘सॅम फॅरल-ली’ यांनी, ‘चीनसारख्या विस्तारवादी हुकूमशाहीच्या उदारतेवर धोरणात्मकपणे अवलंबून राहण्याची चूक केली तर ऑस्ट्रेलियाला असलेला धोका वाढेल’, असा इशारा दिला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |