बलोचिस्तानमधील भीषण स्फोटात तालिबान प्रमुख अखुंझदाच्या भावाची हत्या

बलोचिस्तानमधील भीषण स्फोटात तालिबान प्रमुख अखुंझदाच्या भावाची हत्या

क्वेट्टा/काबुल – पाकिस्तानच्या बलोचिस्तानची राजधानी क्वेट्टामधील प्रार्थनास्थळात घडविलेल्या भीषण स्फोटात तालिबान प्रमुख अखुंझदाच्या सख्ख्या भावाची हत्या करण्यात आली. अखुंझदाचा भाऊ हफीझ अहमदुल्ला प्रार्थनास्थळाचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. अफगाणिस्तानचे माजी गुप्तचर प्रमुख सालेह यांनी हफीझची हत्या पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे समर्थन असलेल्या कट्टरपंथीयांच्या गटाने घडविली असावी, असा आरोप केला आहे.

तालिबान प्रमुख, स्फोट, हफीझ अहमदुल्ला, शांतीचर्चा, क्वेट्टा, काबुल, अमेरिका

अफगाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिका व तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरू आहे. मात्र आठ फेर्‍यानंतरही त्यातून ठोस काहीही निष्पन्न झालेले नाही. अमेरिकेकडून तालिबानबरोबरील शांतीकराराच्या जवळ पोहोचल्याचे दावे करण्यात येत असले, तरी त्यापुढे काहीही प्रगती झाल्याचे समोर आलेले नाही. त्याचवेळी अमेरिकेबरोबरील कराराच्या मुद्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत वाद ऐरणीवर येत असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे.

शुक्रवारी घडविण्यात आलेला हल्ला या अंतर्गत वादाचा परिणाम असू शकतो, असे सांगण्यात येत आहे. २०१६ साली हैबतुल्लाह अखुंझदाने तालिबान प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्याने आपल्या भावाला हफीझ अहमदुल्लाला क्वेट्टामधील प्रार्थनास्थळाचा प्रमुख बनवले होते. हे प्रार्थनास्थळ तालिबानमध्ये ‘क्वेट्टा शुरा’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या गटाचे केंद्र मानले जाते. तालिबानचे सदस्य या प्रार्थनास्थळाला सातत्याने भेट देतात, अशी माहिती समोर आली आहे.

क्वेट्टातील स्फोटात अखुंझदाच्या भावाचा मृत्यू झाला असून दोन इतर निकटवर्तिय गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानी पोलिस तसेच तालिबाननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या महिन्याभरात अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांनी घडविलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे १५०० जणांचा बळी गेला आहे. यापैकी बहुतांश हल्ल्यांसाठी तालिबान जबाबदार आहे. तालिबानकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू असूनही अमेरिका कतारमध्ये तालिबानबरोबर वाटाघाटी करीत आहे. या वाटाघाटींना मोठे यश मिळत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

पण अफगाणी सरकार, सुरक्षा यंत्रणा व जनता तालिबानबरोबरच्या वाटाघाटींवर समाधानी नाही. पाकिस्तानातील दहशतवाद संपुष्टात येत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानात शांती व स्थैर्य प्रस्थापित होऊ शकत नसल्याची तक्रार अफगाण सरकार व सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तालिबान प्रमुखाच्या निकटवर्तियाची हत्या लक्ष वेधून घेणारी ठरते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info