आफ्रिकेतील ‘बुर्किना फासो’मध्ये सात लाख जणांची उपासमार – ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चा दावा

आफ्रिकेतील ‘बुर्किना फासो’मध्ये सात लाख जणांची उपासमार – ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चा दावा

जीनिव्हा – पश्‍चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये तब्बल सात लाखांहून अधिक नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढावली असून या देशाला मोठ्या मानवतावादी आपत्तीला तोंड द्यावे लागेल, असा इशारा ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने दिला आहे. गेल्या काही महिन्यात बुर्किना फासोमध्ये जोरदार अंतर्गत संघर्ष भडकला असून अवघ्या सहा महिन्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. उपासमारी व संभाव्य मानवतावादी आपत्तीसाठी हाच संघर्ष कारणीभूत आहे, असा दावा ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने केला.

‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चे संचालक डेव्हिड बिस्ले यांनी नुकताच बुर्किना फासोचा दौरा केला. या दौर्‍यानंतर आफ्रिकी देशातील भीषण परिस्थितीची माहिती देताना ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने उपासमारीच्या संकटाकडे लक्ष वेधले. गेल्या सहा महिन्यात बुर्किना फासोमध्ये अंतर्गत संघर्षाची तीव्रता सातत्याने वाढते आहे. यात दहशतवादी हल्ल्यांसह, अपहरण, हत्या व वांशिक वादाचाही समावेश आहे. संघर्षामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर विस्थापित होत असून सहा महिन्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांवर बेघर होण्याची वेळ ओढवली आहे.

सततच्या संघर्षामुळे देशात अस्थैर्य निर्माण झाले आहे. शाळा, आरोग्य केंद्रे व आंतरराष्ट्रीय गटांच्या छावण्याही बंद पडल्या आहेत. त्यामुळे सरकारी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून स्थानिकांना योग्य प्रमाणात सहाय्य पुरविणेही मुश्किल झाल्याचे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने स्पष्ट केले. सध्या देशांतर्गत अन्नधान्याचे साठेही तळाला पोचले असून बुर्किना फासोतील नागरिकांना अन्नधान्याच्या पुरवठा करण्यासाठी किमान साडेतीन कोटी डॉलर्स अर्थसहाय्याची आवश्यकता आहे, असे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चे संचालक डेव्हिड बिस्ले यांनी सांगितले.

बुर्किना फासोची लोकसंख्या सुमारे १.८० कोटी असून त्यातील १० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित असल्याकडेही ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने लक्ष वेधले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info