खेर्सनमधील रशियन लष्कर माघार घेत असल्याची संरक्षणमंत्री शोईगू यांची घोषणा

- युक्रेनकडून सावधगिरीची भूमिका

रशियन लष्कर माघार

मॉस्को – दक्षिण युक्रेनमधील मोक्याचे शहर असलेल्या खेर्सनमधून रशियन लष्कर माघार घेत असल्याची घोषणा संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी केली. सध्या या क्षेत्रातील स्थिती लक्षात घेऊन लष्करी तुकड्यांची फेररचना तसेच मनुष्यहानी रोखणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे संरक्षणमंत्री शोईगू म्हणाले. रशियाच्या युक्रेनमधील मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या जनरल सर्जेई सुरोविकिन यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. रशियाच्या या माघारीवर युक्रेनसह अमेरिकेने सावधगिरीची प्रतिक्रिया नोंदविली. खेर्सनमधील माघारीचा निर्णय हे सामरिक फेररचनेसाठी उचललेले पाऊल असू शकते, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला.

रशियन लष्कर माघार

गेले काही आठवडे डोनेत्स्क प्रांत व खेर्सन भागात रशिया आणि युक्रेनच्या लष्करात तीव्र लढाई सुरू होती. युक्रेनने खेर्सन शहर व डिनिप्रो नदीवर ताबा मिळविण्यासाठी जोरदार प्रतिहल्ले चढविले होते. मात्र त्याला फार मोठे यश मिळाले नव्हते. रशियन लष्कराने मोठ्या संघर्षाचे संकेत देत खेर्सनमधील हजारो नागरिकांचे स्थलांतर केले होते. येत्या काही दिवसात खेर्सनसाठी निर्णायक संघर्ष होईल, असे संकेतही देण्यात आले होते. मात्र संरक्षणमंत्री शोईगू यांनी माघारीची घोषणा करीत धक्का दिला आहे. यापूर्वी उत्तर युक्रेनमधील खार्किव्हमधून माघार घेताना रशियन सैन्याला जबर हानी सोसावी लागली होती. ही बाब ध्यानात घेऊन खेर्सन शहरातून योजनाबद्ध माघारी घेण्याचा निर्णय रशियन नेतृत्तत्वाने घेतल्याचे सांगण्यात येते.

रशियन लष्कर माघार

खेर्सन शहरातील डिनिप्रो नदीच्या पश्चिमेकडील क्षेत्रातून माघारीला सुरुवात झाली आहे. ही माघा फक्त शहरातूनच असून खेर्सन प्रांतातील इतर भागांमधील रशियन तैनाती कायम असणार आहे. खेर्सनच्या माघारीतून उपलब्ध झालेले लष्करी बळ इतर भागांमधील मोहिमेसाठी वापरण्यात येईल, अशी माहिती जनरल सर्जेई सुरोविकिन यांनी दिली. रशियाच्या या माघारीवर युक्रेन व अमेरिकेने सावध प्रतिक्रिया नोंदवली. युक्रेनने रशियाच्या निर्णयावर संशय व्यक्त केला असून हा लष्करी फेररचनेचा भाग असू शकतो व रशियन फौजा पुन्हा तैनात होऊ शकतात, असे म्हटले आहे. नाटोने रशियाच्या माघारीचे स्वागत केले असले तरी रशियन क्षमतेला कमी लेखून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिली.

दरम्यान, इंडोनेशियात होणाऱ्या ‘जी२०’ परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित राहणार नसल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. त्याऐवजी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करतील, असे रशियाकडून सांगण्यात आले. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या आघाडीने पुतिन यांच्या उपस्थितीच्या मुद्यावर इंडोनेशियावर दबाव टाकला होता, असेही सांगण्यात येते. राष्ट्राध्यक्ष पुतिन व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून परिषदेला संबोधित करतील, असे रशियाने नमूद केले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info