इस्रायलच्या लेबेनॉनवरील १०० तोफगोळ्यांच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहची इस्रायलला नव्या संघर्षाची धमकी

इस्रायलच्या लेबेनॉनवरील १०० तोफगोळ्यांच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहची इस्रायलला नव्या संघर्षाची धमकी

तेल अविव/बैरूत – लेबेनॉनमधून इस्रायलच्या उत्तरेकडील ‘अविवीम’ शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खवळलेल्या इस्रायलने लेबेनॉनच्या हद्दीत १०० हून अधिक तोफगोळ्यांचा मारा केला. ‘‘आपल्या ठिकाणांवर हल्ले चढवून इस्रायलने ‘रेड लाईन’ ओलांडली असून हिजबुल्लाह लवकरच इस्रायलविरोधात नवा संघर्ष छेडेल. इस्रायलच्या दूरवरच्या शहरांपर्यंत हल्ले चढविले जातील’’, अशी धमकी हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने दिली.

रविवारी संध्याकाळी लेबेनॉनमधून इस्रायलच्या उत्तरेकडील शहरात रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचे जोरदार हल्ले सुरू झाले. सीमेवर आधीच तैनात असलेल्या इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी काही हल्ले यशस्वीरित्या भेदले. तर काही क्षेपणास्त्रे सीमेजवळच्या शेतांमध्ये कोसळली. यानंतर इस्रायलच्या सीमाभागात आग पेटली होती.

पुढच्या काही मिनिटात इस्रायली लष्कराने लेबेनॉनच्या शिबा फार्म्स व आसपासच्या भागात १०० हून अधिक तोफगोळ्यांचा वर्षाव केला. इस्रायलच्या या प्रतिहल्ल्यात किती हानी झाली, याचे तपशील उघड होऊ शकले नाहीत. पण इस्रायलने लेबेनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे   संतापलेल्या हिजबुल्लाहने इस्रायलला नव्या संघर्षाची धमकी दिली.

‘इस्रायलच्या लष्कराने येत्या काळात लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या  ठिकाणांवर हल्ले चढविले तर इस्रायलची  सर्व सीमा आणि जवानांची सुरक्षा धोक्यात येईल. आमच्या ठिकाणांवर ड्रोन्सचे हल्ले घडवून इस्रायलने मोठी आगळीक केली. इस्रायलच्या या हल्ल्यांमुळे नव्या संघर्षाची सुरुवात झाली असून यापुढे इस्रायलवर हल्ले चढविताना हिजबुल्लाह कुठल्याही मर्यादा पाळणार नाही. इस्रायलच्या दूरवरील शहरांवरही हिजबुल्लाह हल्ले चढविल’, अशी धमकी हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाने दिली.

गेल्या आठवड्यात लेबेनॉनमधील इराणसमर्थक हिजबुल्लाह आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांच्या तळांवर हवाई हल्ले चढवून इस्रायलने या संघटनांची गय केली जाणार नाही, असा संदेश दिला होता. याआधी इराक व सिरियामधील इराण व हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य करून इस्रायलने फार मोठा शस्त्रसाठा नष्ट केला होता. इराक, सिरिया, गाझा व लेबेनॉनमधील इराणसमर्थक संघटनांना, विशेषतः हिजबुल्लाहला लक्ष्य करून इस्रायलने या संघटनांच्या मागे असलेल्या इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इस्रायल नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांना संपविल्याखेरीज इस्रायल स्वस्थ बसणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी घोषित केले होते.

इस्रायलचे हे हल्ले सुरू असताना, गाझापट्टीतील हमास, लेबेनॉन-इराक तसेच सिरियामधील हिजबुल्लाहचे पाठिराखे आणि इराण इस्रायलवर आकस्मिक हल्ला  चढवतील, अशी शक्यता इस्रायलच्याच एका लष्करी अधिकार्‍यांनी वर्तविली होती. त्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला या अधिकार्‍याने दिला होता. मात्र आपल्यावर होऊ शकणार्‍या या हल्ल्यांना  तोंड देण्याची तयारी इस्रायलने केल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info