तेहरान/दुबई/वॉशिंग्टन – तेहरानबाबत सारे पर्याय खुले असल्याचे सांगून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला देश इराणवरील कारवाईसाठी सज्ज असल्याची घोषणा केली होती. आम्ही केवळ सौदीच्या इशार्याची प्रतीक्षा करीत आहोत, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते. सौदी अरेबियानेही आपल्या इंधनप्रकल्पावरील हल्ल्यामागे इराण असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे जाहीर केले आहे. तर इराणवरील कारवाईचे सारे ‘पर्याय’ अमेरिकी संरक्षणदलांच्या अधिकार्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर मांडले आहेत. यामध्ये थेट लष्करी हल्ल्यापासून ते सायबर हल्ल्यापर्यंतच्या सर्वच पर्यायांचा समावेश असल्याची बातमी अमेरिकी वृत्तवाहिनीने दिली आहे.
सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत लष्करी अधिकार्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर इराणविरोधात वेगवेगळे पर्याय सुचविले होते. या बैठकीशी संबंधित अधिकार्याने ही माहिती अमेरिकी वृत्तवाहिनीला दिली.
अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी देखील अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ची आखातातील घडामोडींवर नजर रोखलेली असून आमची पापणी देखील लवलेली नाही, असे स्पष्ट केले. याआधी कधीही अमेरिकेच्या सर्वच यंत्रणा इतक्या प्रमाणात आखातात गुंतलेल्या नव्हत्या, असेही जनरल डनफोर्ड पुढे म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच इराणला लष्करी प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती. यासाठी अमेरिकेने बंदूक बार भरून रोखलेली असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. महिन्याभरापूर्वी इराणने पर्शियन आखातात अमेरिकेचा ड्रोन पाडल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ले चढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी हल्ल्यांचे आदेश मागे घेऊन इराणच्या अणुकार्यक्रमावर सायबर हल्ले चढविले होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणबाबत कुठला पर्याय स्वीकारतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
त्यातच सौदी अरेबियाच्या यंत्रणांनी आपल्या इंधनप्रकल्पावरील हल्ल्यामागे इराणच असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका व सौदी अरेबिया आणि मित्रदेश इराणवर कारवाई करणार, हे ही निश्चित झाल्याचे दिसते.
दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, इंधनप्रकल्पांवर झालेले हल्ले हे सौदी अरेबियासाठी इशारा असल्याचा दावा रोहानी यांनी केला. सौदीसह अमेरिका, इस्रायल आणि युरोपिय देशांनी येमेनमध्ये छेडलेल्या संघर्षाचे परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात येमेनींनी सौदीच्या इंधनप्रकल्पावर हल्ला चढविला होता, असे रोहानी म्हणाले. सौदीने या हल्ल्यानंतर योग्य तो धडा घेऊन येमेनमधील कारवाई थांबवली नाही तर या क्षेत्रात युद्ध भडकेल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |