सिरियातील इराणच्या ठिकाणांवर सौदी अरेबियाचे हवाई हल्ले – इराणसंलग्न गटाचे दहशतवादी ठार

सिरियातील इराणच्या ठिकाणांवर सौदी अरेबियाचे हवाई हल्ले – इराणसंलग्न गटाचे दहशतवादी ठार

लंडन – सिरिया आणि इराकच्या सीमेजवळील ‘अबूकमाल’ येथील इराणसंलग्न गटाच्या ठिकाणावर सौदी अरेबियाने हवाई हल्ले चढविले. यामध्ये ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स’ (पीएमएफ) या इराणसंलग्न गटाचे पाच दहशतवादी ठार झाले. एका अरबी वृत्तसंस्थेने पाश्‍चिमात्य सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली.

गुरुवारी पहाटे सौदीच्या लढाऊ विमानांनी ही कारवाई केल्याचे या बातमीत म्हटले आहे. सौदीबरोबर मित्रदेशांच्या लढाऊ विमानांनी देखील या कारवाईत सहभाग घेतला होता, असा दावा केला जातो. ‘अबूकमाल’ येथील लष्करी तळावर इराणसंलग्न ‘पीएमएफ’ने तळ ठोकला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा केला आहे.

सौदी व मित्रदेशांच्या हवाई हल्ल्यात क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, बॅटरीज् आणि इतर शस्त्रसाठा नष्ट झाल्याची माहिती सदर वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली.

सौदी अरेबियाच्या अबकैक येथील अरॅम्को कंपनीच्या इंधनप्रकल्पावर झालेल्या हल्ल्यांसाठी याच ठिकाणाचा वापर केल्याचा दावाही या वृत्तसंस्थेने केला. तर आपल्यावरील हल्ल्यांसाठी फक्त इराणच जबाबदार असल्याचा सौदीने ठपका ठेवला आहे. सौदीने याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही.

गेल्या दोन दिवसात सिरियाच्या ‘अबूकमाल’वर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. काही तासांपूर्वी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी देखील याच लष्करी तळावर हवाई हल्ले चढविले होते. गेल्या आठवड्यातही इस्रायली वायुसेनेने ‘पीएमएफ’च्या ठिकाणी जोरदार हल्ले चढवून इराणला मोठा हादरा दिला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info