वॉशिंग्टन – अमेरिका सिरियातून आपले सैन्य माघारी घेत असले तरी आम्ही कुर्दवंशियांना वार्यावर सोडलेले नाही. तुर्कीने मर्यादेच्या बाहेर जाऊन सिरियातील कुर्दवंशियांवर हल्ले चढवलेच, तर त्याचे भयंकर परिणाम तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील. अमेरिका कुर्दवंशियांना आर्थिक व लष्करी सहाय्य करीतच राहिल’, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
सिरियातून सैन्य माघारी घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कुर्दवंशियांवरील तुर्कीच्या हल्ल्याला परवानगीच दिली आहे, अशी टीका अमेरिकन नेत्यांनी केली होती. या कुर्दवंशियांनी सिरिया व इराकमधील ‘आयएस’विरोधी संघर्षात अमेरिकेला साथ दिली होती, याची आठवण संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी करून दिली. तर सिनेटर लिंडसे ग्रॅहम व मार्को रुबिओ यांनी ट्रम्प यांचा हा निर्णय सर्वथा चुकीचा असल्याचा ठपका ठेवला होता.
मात्र सिरियातील सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तुर्कीला सज्जड शब्दात इशारा दिला. तुर्की अमेरिकेचा नाटोमधील सहकारी देश आहे, हे विसरता येणार नाही. पण कुर्दवंशिय देखील अमेरिकेचे सहकारी आहेत व त्यांना अमेरिका वार्यावर सोडणार नाही, असे सांगून ट्रम्प यांनी तुर्कीची बेलगाम कारवाई सहन केली जाणार नाही, असे खडसावले आहे.
‘सिरियात कारवाई करताना तुर्कीने मर्यादा ओलांडून कुर्दांवर हल्ले चढविले तर मी तुर्कीची अर्थव्यवस्था नष्ट करीन. मी याआधी घेतली नव्हती, इतकी कठोर भूमिका तुर्कीसाठी घ्यावी लागेल’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. सिरियातील ‘वायपीजी’ ही कुर्द बंडखोर संघटना तुर्कीतील ‘पीकेके’ या कुर्द गटाशी संलग्न आहे. तुर्कीने ‘पीकेके’ला दहशतवादी जाहीर केले असून ‘वायपीजी’ यांना देखील दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे तुर्कीच्या अस्थैर्याला जबाबदार असणार्या कुर्दांवर कारवाई करण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला आहे. तसेच सिरियात सैन्य घुसविल्यानंतर आपले लष्कर ‘आयएस’ आणि ‘कुर्द’ यांच्यात फरक करणार नसल्याचेही तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.
किंबहुना तुर्कीच्या भूभागावर अधिकार सांगणार्या सिरियन कुर्दांना संपविण्यासाठीच तुर्की सिरियामध्ये ही कारवाई करीत आहे. मात्र तुर्कीने अशी कारवाई केल्यास, अमेरिका स्वस्थ बसणार नाही, हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी बजावल्यानंतर, ही कारवाई पुढे नेणे तुर्कीसाठीही अवघड जाऊ शकते. पण सिरियात मोठ्या प्रमाणात सैन्य व लष्करी साहित्य घुसविणार्या तुर्कीसाठी आता माघार घेणेही अवघड ठरू शकते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |