जलालाबाद – गेल्या काही दिवसांपासून अफगाण लष्कराने नानंगरहार प्रांतात सुरू केलेल्या कारवाईनंतर ‘आयएस’चे २४३ दहशतवादी तसेच जवळपास ४०० कुटुंब सदस्यांनी अफगाण सरकारसमोर शरणागती पत्करली. अफगाणिस्तानच्या लष्कराला मिळालेले हे सर्वात मोठे यश असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी केला. तर नानगरहार प्रांतातील ‘आयएस’चे वर्चस्व संपल्यामुळे तालिबानने समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणी लष्कराने अमेरिकेच्या लष्करी सल्लागारांच्या साथीने नानगरहार प्रांतातील ‘आयएस’ला एकटे पाडण्यास सुरुवात केली होती. या प्रांताच्या महामार्गांवर ताबा मिळवून अफगाणी लष्कराने ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना मिळणारी रसद रोखली होती. याचा परिणाम ‘आयएस’वर झाला. ही कोंडी फोडण्यासाठी ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी आपल्या कुटुंबियांसह शरण येण्यास सुरुवात केली.
मंगळवारी अफगाणी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘आयएस’चे २४३ दहशतवादी शरण आले. तर या दहशतवाद्यांच्या सुमारे ६०० परिवार सदस्य देखील शरण आले असून यामध्ये ६३ महिला आणि १०७ मुलांचा समावेश असल्याची माहिती नानगरहार प्रांताचे गव्हर्नर शाहमहमूद मियाखेल यांनी दिली. एकूण दोन हजार ‘आयएस’चे दहशतवादी शरण येणार असल्याचा दावा मियाखेल यांनी केला.
तर ‘‘‘आयएस’विरोधी कारवाईत अफगाणिस्तानला यश मिळणार नाही, असे सर्वांचे मत बनले होते. पण आज आम्हीच ‘आयएस’ला संपविले आहे’’, याकडे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी लक्ष वेधले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |