स्वीडनकडून चीनच्या ‘हुवेई’ व ‘झेडटीई’वर बंदी

स्वीडनकडून चीनच्या ‘हुवेई’ व ‘झेडटीई’वर बंदी

स्टॉकहोम – युरोपमधील प्रगत व आघाडीचा देश म्हणून ओळखण्यात येणाऱ्या स्वीडनने, ५जी तंत्रज्ञान क्षेत्रात चीनच्या ‘हुवेई’ व ‘झेडटीई’ या कंपन्यांवर बंदीची घोषणा केली आहे. चीन हा स्वीडनला असणाऱ्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक असल्याचे सांगत स्वीडनने या बंदीचे समर्थन केले आहे. अवघ्या १० दिवसात, ५जी तंत्रज्ञान क्षेत्रात चीनला धक्का देणारा स्वीडन हा दुसरा मोठा युरोपिय देश ठरला असून, यापूर्वी बेल्जियमनेही ‘हुवेई’ या चिनी कंपनीला कंत्राट नाकारले होते. एकामागून एक युरोपिय देश चीनला धक्के देत असतानाच, लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या ब्राझिलनेही चिनी कंपन्यांना दूर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

'हुवेई'

स्वीडनच्या ‘पोस्ट अँड टेलिकॉम ऑथोरिटी’ने मंगळवारी चीनच्या दोन्ही कंपन्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केला. ‘स्वीडनच्या दूरसंचार क्षेत्रातील चारही कंपन्यांनी नवे ५जी नेटवर्क उभारण्यासाठी हुवेई व झेडटीई या चिनी कंपन्यांचे कोणत्याही प्रकारे सहाय्य घेऊ नये. सध्या कार्यरत असणाऱ्या नेटवर्कचा वापर ५जी साठी करायचा असल्यास त्यातील चिनी कंपन्यांची यंत्रणाही पूर्णपणे काढून टाकण्यात यावी’, अशा स्पष्ट शब्दात स्वीडनने चिनी कंपन्यांना ५जी क्षेत्रात स्थान देणार नसल्याची घोषणा केली आहे. स्वीडनचे लष्कर व सुरक्षायंत्रणांनी दिलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा खुलासाही स्वीडिश यंत्रणेने केला. स्वीडनच्या या नकारामागे अमेरिकेने टाकलेले दडपण कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. स्वीडनच्या बंदीमुळे चीनला पुन्हा मोठा धक्का बसला असून, हा निर्णय आश्चर्यचकित तसेच निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया हुवेई कंपनीने दिली आहे.

अवघ्या १० दिवसांपूर्वी युरोपमधील आघाडीचा देश असणाऱ्या बेल्जियमने ५जी क्षेत्रात ‘हुवेई’ या चिनी कंपनीला कंत्राट नाकारले होते. बेल्जियममध्ये नाटो तसेच युरोपिय महासंघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे अनेक देशांचे वरिष्ठ नेते व अधिकारी यांचा या देशात सातत्याने वावर असतो. दोन वर्षांपूर्वी चीनने बेल्जियममध्ये हेरगिरीचे नेटवर्क उभारल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिनी कंपनीला ५जी नेटवर्कच्या बाहेर ठेवण्यात आल्याची माहिती बेल्जियन अधिकाऱ्यांनी दिली होती. स्वीडन व बेल्जियमपूर्वी ब्रिटन तसेच फ्रान्सने ५जी नेटवर्कमधून चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. जर्मनीने ५जी क्षेत्रातील नियम कठोर करण्याचे संकेत दिले असून, त्याद्वारे चिनी कंपन्याना दूर ठेवले जाईल, असे मानले जाते. तर अमेरिकेच्या दबावानंतर इटलीनेही चिनी कंपन्यांसंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

'हुवेई'

दरम्यान, ५जी तंत्रज्ञान क्षेत्रात चीनला अजून एक धक्का देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या ब्राझिलने चिनी कंपन्यांवर बंदीचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा रॉबर्ट ओब्रायन यांनी नुकतीच ब्राझीलला भेट दिली होती. या भेटीत अमेरिका व ब्राझीलमध्ये व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या या करारात, ५जी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी ब्राझीलला मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. चीन हा ब्राझिलचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असताना, अमेरिकेने केलेला करार व ब्राझीलकडून ५जी संदर्भात देण्यात आलेले संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात.

चीनची ‘हुवेई’ ही कंपनी सध्या ‘५जी’ तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखण्यात येते. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट व लष्कराशी अत्यंत जवळचे संबंध असणाऱ्या या कंपनीने जगातील बहुतांश प्रमुख देशांमध्ये ‘५जी तंत्रज्ञानाचे जाळे पसरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र जगातील आघाडीचे देश एकापाठोपाठ एक कारवाई करू लागल्याने हुवेईसह चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्ववादाचे इरादे धुळीस मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info