इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ले अमेरिकी कॉन्ट्रॅक्टर ठार तर काही अमेरिकी सैनिक जखमी

वॉशिंग्टन/बगदाद – इराकच्या उत्तरेकडील ‘किरकूक’ येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर ३० रॉकेट हल्ले झाले. या रॉकेट हल्ल्यांमध्ये अमेरिकन कॉन्ट्रॅक्टर ठार झाला असून काही अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत. या रॉकेट हल्ल्यांसाठी इराकमधील ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ ही इराणसंलग्न सशस्त्र संघटना जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला जातो. दरम्यान, इराक सरकारने अमेरिकेच्या हितसंबंधांवर होणारे हल्ले रोखले नाही तर पुढे जे काही होईल, ते कोणाच्याही हातात नसेल, असा इशारा अमेरिकेने दिला होता.

इराकमध्ये तैनात असलेल्या अमेरिका व मित्रदेशांच्या संयुक्त लष्कराने किरकूकमधील हल्ल्याची माहिती दिली. शुक्रवारी संध्याकाळी येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर जोरदार रॉकेट्सचे हल्ले झाले. किमान ३० रॉकेट्सनी लष्करी तळाला लक्ष्य केले. येथील शस्त्रास्त्रांचे कोठारही या रॉकेट हल्ल्यात नष्ट झाले. अमेरिका तसेच इराकी सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एक अमेरिकी कॉन्ट्रॅक्टर ठार झाला असून बळींची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या या रॉकेट हल्ल्यांचे ठिकाण इराकी सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढले.

गेल्या काही वर्षांमध्ये इराकमध्ये अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करणारा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा केला जातो. या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. किरकूक भागात ‘आयएस’ तसेच इराणसंलग्न सशस्त्र गटांचा प्रभाव आहे. पण यापैकी इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ (पीएमएफ) या सशस्त्र संघटनेवर दाट संशय व्यक्त केला जातो. ‘आयएस’पेक्षाही इराणसंलग्न ‘पीएमएफ’कडून इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांना मोठा धोका असल्याचा इशारा याआधीच अमेरिकेने दिला होता.

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी इराकमधील ‘अल-असाद’ हवाईतळावर तैनात अमेरिकी सैनिकांना भेट दिली होती. त्यांच्या या भेटीच्या चार दिवसानंतर सदर हवाईतळावर पाच रॉकेट हल्ले झाले होते. तर त्याआधी, नोव्हेंबर महिन्यात उत्तरेकडील कयारा येथील हवाईतळावर १२ हून अधिक रॉकेट हल्ले झाले होते. या हवाईतळावरही अमेरिकेचे सैनिक होते.

त्यामुळे गेल्या महिन्याभरात इराकमधील अमेरिकी सैनिकांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसत आहे. याआधीच्या हल्ल्यांसाठी इराणसंलग्न ‘पीएमएफ’ जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. तसेच अमेरिका व मित्रदेशांच्या हितसंबंधांवर होणारे ‘पीएमएफ’चे हल्ले रोखण्यासाठी इराक सरकार पुढाकार घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. तसेच इराकमधील आपल्या दूतावासाच्या कर्मचार्‍यांना मायदेशी बोलावून घेतले होते.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी स्पष्ट शब्दात इराकला धमकावले होते. ‘इराकमधील अमेरिकी सैनिक किंवा हितसंबंधांवरील हल्ले रोखणे ही इराकची जबाबदारी आहे. अन्यथा आपल्या सैनिकांच्या सुरक्षेचा सर्वाधिकार अमेरिकेकडे आहे. अमेरिकेने आपल्या अधिकारांचा वापर केला तर ते इतर कुणाच्याही हिताचे नसेल’, असा इशारा संरक्षणमंत्री एस्पर यांनी दिला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info