कुद्स फोर्सचे प्रमुख कासेम सुलेमानी इराणसाठी इतके महत्त्वाचे का होते?

कुद्स फोर्सचे प्रमुख कासेम सुलेमानी इराणसाठी इतके महत्त्वाचे का होते?

इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्डस्’चा अत्यंत महत्त्वाचा भाग अशी ‘कुद्स फोर्स’ची ओळख आहे. देशाबाहेरील इराणच्या हितसंबंधांचे रक्षण करणे आणि इराणचे वर्चस्व वाढवित राहणे, हे कुद्स फोर्ससमोरील ध्येय मानले जाते. या कुद्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल सुलेमानी यांनी हे काम अत्यंत कौशल्याने पार पाडले. त्यामुळेच इराक, सिरिया, लेबेनॉन, येमेन या देशांमध्ये इराणचा प्रचंड प्रमाणात प्रभाव वाढला होता. ही कामगिरी करून दाखविणारे मेजर जनरल सुलेमानी हे इराणचे रणधुरंधर सेनानी मानले जायचे.

इराणमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी दुसर्‍या किंवा तिसर्‍या स्थानावर सुलेमानी असल्याचे दावे केले जात होते. इराणचे परराष्ट्र धोरण दुसरे कुणी नाही तर आपणच निश्‍चित करतो, असे सुलेमानी यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले होते. इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खामेनी यांचा सर्वाधिक विश्‍वास सुलेमानी यांनी संपादन केला होता. पुढच्या काळात त्यांना इराणचे राजकीय नेतृत्त्व देखील मिळू शकले असते, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

इराक, सिरिया, लेबेनॉन, येमेन या देशांमध्ये इराणसमर्थक गटांचे प्रबळ संघटन तयार करून सुलेमानी यांनी अमेरिका व इस्रायलला जेरीस आणण्याचे प्रयत्न केले. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बहारिन या इराणविरोधी देशांना धडा शिकवणार्‍या कारवाया सुलेमानी यांनी केल्या होत्या. इराणी जनतेमध्ये सुलेमानी सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे बोलले जात होते.

२००६ साली इस्रायल व हिजबुल्लाहमध्ये झालेल्या ३६ दिवसांच्या युद्धात सुलेमानी यांनी हिजबुल्लाहला सर्वतोपरी सहाय्य करून इस्रायलला मोठा धक्का दिला होता. तसेच इराणच्या विरोधात कारवाया करणार्‍या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या विरोधात सुलेमानी यांनी जबरदस्त कारवाई करून दाखविली होती.

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे मेजर जनरल सुलेमानी ठार

वॉशिंग्टन/बगदाद – ड्रोन हल्ला चढवून अमेरिकेने इराणचे मेजर जनरल कासेम सुलेमानी यांना ठार केले. इराकची राजधानी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर पडलेल्या सुलेमानी यांच्या ताफ्यावरच अमेरिकेच्या ‘एमक्यू-९’ रिपर ड्रोनने चार क्षेपणास्त्रे दागली. गुरुवारी रात्री १२ वाजून ३४ मिनिटांनी हा हल्ला चढविण्यात आला व यात मेजर जनरल सुलेमानी जागीच ठार झाले. इराकच्या ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’चे (पीएमएफ) उपप्रमुख ‘अबू महदी अल-मुहानदिस’ हे देखील ठार झाले. अमेरिकन नागरिकांवर भीषण हल्ला चढविण्याचे कारस्थान सुलेमानी यांनी आखले होते. ते हाणून पाडून अमेरिकन नागरिकांच्या रक्षणासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार हा हल्ला चढवून कासेम सुलेमानी यांना संपविण्यात आल्याचे पेंटॅगॉनने म्हटले आहे. सुलेमानी यांनी अमेरिकन नागरिकांचा बळी घेऊन अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का देण्याचे भयंकर कटकारस्थान आखले होते. ते पूर्णत्वाला जाण्याच्या आधीच कासेम सुलेमानी यांना संपविण्यात आल्याचा दावा पेंटॅगॉनने केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्याचे समर्थन केले. आत्तापर्यंत सुलेमानी यांनी अमेरिकेच्या हजारो सैनिकांचा बळी घेतला होता आणि पुढच्या काळातही सुलेमानी यासाठी कारस्थाने आखत होते. पण तसे करण्याच्या आधीच ते सापडले आणि त्यांना ठार करण्यात आले, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले.

इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शकांवर क्रूरतेने कारवाई केली जात आहे. याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कासेम सुलेमानी जबाबदार होते, असा ठपकाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही सुलेमानी आपल्याच देशात अप्रिय होते, असा दावा केला. तसेच इराकच्या जनतेने रस्त्यावर उतरून सुलेमानी ठार झाल्याचा आनंद व्यक्त केला, असे पॉम्पिओ पुढे म्हणाले. याचा व्हिडिओ देखील पॉम्पिओ यांनी प्रसिद्ध केला आहे. मात्र अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी सुलेमानी यांच्यावरील कारवाईचे स्वागत करून त्याचे समर्थन केले. सुलेमानी यांचे हात अमेरिकन्सच्या रक्ताने माखललेे होते, याची आठवण ग्राहम यांनी करून दिली. तर सुलेमानी यांना ठार केले, पण पुढे काय होईल, याचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी विचार केला आहे का? असा प्रश्‍न अमेरिकेचे विरोधी पक्षनेते विचारत आहेत. कासेम सुलेमानी यांना ठार करणे म्हणजे एखाद्या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला ठार करणे ठरत नाही. ते इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी होते आणि त्यांना ठार करून आपण इराणबरोबर युद्ध पुकारत आहोत, याची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना होती का? असा सवाल डेमोक्रॅट पक्षाचे नेते करीत आहेत. तसेच अमेरिकेने आजवर इराणसारख्या प्रबळ देशाशी थेट युद्ध पुकारलेले नाही, असा दावा हे नेते करीत आहेत.

ट्रम्प यांच्या या आत्मघातकी निर्णयामुळे आखातातील अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात आले आहेत, असा दावा काही अमेरिकी विश्‍लेषकांनीही केला आहे. तर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील आपल्या प्रतिक्रियेत ‘इराण कधीही युद्ध जिंकत नाही आणि वाटाघाटीत हरत नाही’ असे मार्मिक उद्गार काढले आहेत. सुलेमानीवरच्या कारवाईमुळे इराकची जनताही खूश झालेली आहे. कारण इराकच्या जनतेला इराणचे वर्चस्व मान्य नाही. पण गेल्या १५ वर्षात इराणने इराकवर अधिकाधिक वर्चस्व प्रस्थापित केले होते, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेवर भयंकर सूड घेण्याची इराणची धमकी

तेहरान – कासेम सुलेमानी यांना ठार करून अमेरिकेने इराणच्या विरोधात युद्धाचीच घोषणा केली आहे. आता यापुढील परिणामांना सर्वस्वी अमेरिकाच जबाबदार असेल, असे इराणने बजावले आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेण्याची धमकी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिली आहे. इराणच्या राजकीय व्यवस्थेनुसार या देशाच्या सर्वोच्च धर्मगुरुंकडेच सर्वोच्च अधिकार असतात. त्यामुळे आयातुल्ला खामेनी यांनी दिलेली धमकी इराण लवकरच प्रत्यक्षात उतरविल, अशी चिंता जगभरातील विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. तर काहीजणांनी यामुळे तिसर्‍या महायुद्धाचा तीव्र भडका उडेल, असा दावा केला आहे.

जगातील सर्वात क्रूर इसमांनी कासेम सुलेमानी यांचा बळी घेतला. सुलेमानी कित्येक वर्षापासून पाशवी शक्तींशी लढा देत होते. ईश्‍वराच्या इच्छेनुसार ते शहीद झाले पण त्यांचा लढा थांबणार नाही, अशा शब्दात खामेनी यांनी सुलेमानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या हत्येचा अमेरिकेवर भयंकर सूड घेतला जाईल, असा निर्धार खामेनी यांनी व्यक्त केला. न्यायासाठी संघर्ष करणारे सारेजण आता सुलेमानी यांचा सूड उगवण्यासाठी पुढे येतील, असे सांगून खामेनी यांनी अमेरिकेला प्रतिहल्ल्याची धमकी दिली. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणचा निर्धार अधिकच भक्कम झाल्याचा दावा केला.

इराणमध्ये ठिकठिकाणी खामेनी यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी लाखोजण रस्त्यावर उतरले व त्यांनी अमेरिकेचा सूड घेण्याची मागणी केली आहे. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणच्या सुरक्षाविषयक समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली.

या बैठकीत अमेरिकेच्या विरोधातील डावपेचांवर चर्चा पार पडल्याचे दावे इराणी वृत्तसंस्थांनी केले आहेत. इराणचे परराष्ट्र जावेद झरिफ यांनी अमेरिकेने सुलेमानी यांना ठार करून इराणच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याचा आरोप केला.

यापुढच्या घटनाक्रमाला सर्वस्वी अमेरिकाच जबाबदार असेल, असे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी बजावले आहे. आखातातील विश्‍लेषक देखील अमेरिकेने युद्ध सुरू केल्याचा दावा करीत असून येत्या काही दिवसातच याचे भयंकर परिणाम समोर येतील, अशी चिंता व्यक्त केली आहे. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि इराकमधील इराणसमर्थक ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ने (पीएमएफ) आपल्या समर्थकांना युद्धासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे. अंतिम विजय आपलाच असेल, असा संदेश या इराणसमर्थक संघटनांनी आपल्या समर्थकांना दिला आहे.

रशियाने अमेरिकेच्या या कारवाईवर टीका करून याचे भयावह पडसाद उमटतील अशी चिंता व्यक्त केली आहे. चीनने देखील अमेरिकेला संयम दाखविण्याचे आवाहन केले आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आत्ताच्या काळात इराणबरोबरील युद्ध परवडणारे नसेल, असे अमेरिकेला बजावले आहे. त्याचवेळी इराण अमेरिकेला उत्तर देण्यासाठी काय करील, याचे अंदाज विश्‍लेषकांकडून वर्तविले जात आहेत. अमेरिकेच्या आखातातील तळांना लक्ष्य करण्याची धमकी इराणने याआधीच दिली होती. तसेच अमेरिकेचा निकटतम मित्रदेश असलेल्या इस्रायलवर एकाच वेळी अनेक ठिकाणांहून लाखो रॉकेटस्चा मारा करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा दावा इराण व इराणसमर्थक संघटना करीत आहेत, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

इराण कुठल्याही क्षणी होर्मुझच्या आखाताची कोंडी करून इथली इंधनवाहतूक बंद पाडू शकतो. तसे झाले तर जगाच्या आर्थिक नाड्याच आवळल्या जाऊ शकतात. सुलेमानी ठार झाल्यानंतर इंधनाचे दर एकाच दिवसात चार टक्क्यांनी वाढले होते, ही बाब पुढच्या काळातील उलथापालथींचे संकेत देणारी ठरते. याबरोबरच इराणचे समर्थक आखातासह अमेरिकेतही दहशतवादी हल्ले चढवू शकतात, अशी शक्यता काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info