कोरोनाव्हायरस म्हणजे गेल्या ७० वर्षातील कम्युनिस्ट पक्षावरचे सर्वात मोठे संकट – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

कोरोनाव्हायरस म्हणजे गेल्या ७० वर्षातील कम्युनिस्ट पक्षावरचे सर्वात मोठे संकट – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग – ‘चीनच्या वुहान शहरांबरोबर इतरही शहरांमध्ये वेगाने पसरत चाललेली ही ‘कोरोनाव्हायरस’ची साथ म्हणजे गेल्या सात दशकात कम्युनिस्ट पार्टीवर कोसळलेले सर्वात मोठे संकट आहे’, अशी घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली. या भयंकर समस्येवर मात करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा उपाय सापडलेला नाही, याची कबुली देऊन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी त्यावर गंभीर चिंता व्यक्त केली.

कोरोनाव्हायरसच्या साथीत एकट्या चीनमध्ये २५९२ जण दगावले असून जपान, दक्षिण कोरिया या शेजारी देशांबरोबरच आखातातील इराण या देशांमध्येही या साथीचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी कोरोनोव्हायरसच्या या संकटाला रोखण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे आवाहन केले आहे.

या विषाणूचा फैलाव अधिक वेगाने होत असून यावर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसल्याचे जिनपिंग म्हणाले. १९४९ साली कम्युनिस्ट पार्टीने चीनची सत्ता हातात घेतल्यानंतर, गेल्या ७० वर्षात पहिल्यांदाच अशा भीषण साथीने थैमान घातल्याचे दिसत आहे. चीनसाठी हे मोठे संकट असून ही कसोटीची वेळ आहे’, असे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले.

कोरोनाव्हायरसचा फटका चीनच्या उद्योगक्षेत्राला बसत असून चीनची निर्यात कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. यामुळे सावध झालेल्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी कोरोनाव्हायरसच्या प्रभावाखाली नसलेल्या राज्यांनी उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.

या विषाणूच्या दहशतीमुळे जिनपिंग राजवटीने आपल्या राजकीय भेटीगाठी तसेच आंतरराष्ट्रीय बैठका पुढे ढकलल्या आहेत. त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्षाची वार्षिक संसदीय बैठकदेखील रद्द करावी लागली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरससारख्या इतर विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी यापुढे जंगली प्राण्यांचा अन्नासाठी वापर करू नका, अशी सूचना चीनच्या ‘नॅशनल पिपल्स कॉंग्रेस’ने दिली आहे. यानुसार मांजरी, उंदीर, सर्प, सरडे आणि लांडग्यांची पिल्ले यांच्या मांसाचा वापर न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info