रशिया आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनच्या युआनचा वापर करण्यास तयार

- जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेत राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची ग्वाही

मॉस्को/बीजिंग – ‘आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थानिक चलनांचा वाढता वापर ही महत्त्वाची बाब ठरते. राष्ट्रीय चलनांच्या वापरासाठी अधिकाधिक प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी परस्परांच्या बाजारपेठेत वित्तीय व बँकिंग क्षेत्रातील उपक्रमांचा विस्तार होणे आवश्यक आहे. रशियाने आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील देशांबरोबरील व्यापारात चीनच्या युआन चलनाचा वापर करण्याची तयारी दर्शविली आहे. युआनमधील व्यवहारांसाठी रशियाचे भागीदार देश व त्यांचे सहकारी यंत्रणा विकसित करतील, याची आपल्याला खात्री आहे’, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय व्यापारात

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी रशिया व चीनच्या राष्ट्राध्यक्षांसह दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण भागीदारी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी रशिया व चीनमध्ये जवळपास 14 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यात अणुकरारासह शेती, उद्योग, संशोधन, मीडिया, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या क्षेत्रातील करारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त रशिया व चीनमध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी इंधनवाहिनीवर एकमत झाल्याची माहितीही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली.

चीन व रशियामधील व्यापार 150 अब्ज डॉलर्सवर गेला असून 2023 सालच्या अखेरीस 200 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात दोन देशांमधील व्यापार तब्बल 30 टक्क्यांनी वाढला असून त्यात इंधनाचा वाटा सर्वाधिक आहे. रशिया हा चीनसाठी सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश बनल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. तर चीनकडून रशियाला यंत्रसामुग्री, सेमीकंडक्टर्स व कच्च्या मालाची निर्यात होत असल्याचे समोर आले आहे.

व्यापाराबरोबरच संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्णयही पुतिन व जिनपिंग यांच्या भेटीत घेण्यात आला. दोन्ही नेत्यांनी ‘ऑकस सबमरिन डील’ तसेच नाटोच्या वाढत्या हालचालींवर टीकास्त्र सोडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली व्यवस्था टिकविण्यासाठी रशिया व चीन एकत्रितपणे काम करतील यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. यावेळी पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी चीनचा शांतीप्रस्ताव पाया ठरु शकतो, असा दावा केल्याचेही सांगण्यात येते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांकडून रशियाला एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला तैवानसह इतर मुद्यांवरून अमेरिका व युरोपिय देश चीनला घेरण्यासाठी हालचाली करीत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन रशिया व चीनने परस्परांमधील जवळीक अधिकच वाढविली असून इतर मित्रदेशांच्या सहाय्याने अमेरिकेला उघड आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. पुतिन व जिनपिंग यांच्यातील बैठक आणि त्यात झालेली चर्चा व करार त्याचाच भाग ठरतो.

अमेरिकेला आव्हान देण्यासाठीच रशिया व चीनची जवळीक – अमेरिकी प्रवक्त्यांचा दावा

वॉशिंग्टन – रशिया व चीनकडून परस्परांशी वाढणारी जवळीक ही अमेरिकेच्या प्रभावाला आव्हान देण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे, असा दावा अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केला. अमेरिका व पाश्चिमात्य देश नियमांवर आधारलेली व्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न करीत असून रशिया व चीन त्याविरोधात सक्रिय आहेत, असा ठपका किरबाय यांनी ठेवला.

‘रशिया व चीनला खेळाचे नियम बदलायचे आहेत. त्यासाठी ते परस्परांना उपयुक्त मित्र म्हणून बघत आहेत. परस्परांचा वापर करून अमेरिकी नेतृत्त्व व पाश्चिमात्यांना आव्हान देणे हे रशिया व चीनचे उद्दिष्ट आहे’, या शब्दात किरबाय यांनी रशिया व चीनच्या वाढत्या जवळिकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्धात चीनची भूमिका निष्पक्ष असल्याचा चीनचा दावाही किरबाय यांनी फेटाळून लावला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info