रशियन हल्ल्यांमध्ये डिनिप्रोमधील १००हून अधिक युक्रेनी जवान ठार

- रशियाच्या संरक्षण विभागाचा दावा

रशियन हल्ल्यांमध्ये डिनिप्रोमधील १००हून अधिक युक्रेनी जवान ठार

मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रात घणाघाती हल्ले करणाऱ्या रशियन फौजांनी गेल्या ४८ तासांमध्ये मध्य युक्रेनला लक्ष्य केले. युक्रेनमधील चौथ्या क्रमांकाचे शहर असलेल्या डिनिप्रो शहरातील लष्करी तळांना तसेच रेल्वेमार्गावर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात युक्रेनचे १००हून अधिक जवान ठार झाले असून आठ सशस्त्र वाहनांसह १३ लष्करी गाड्या उडवून दिल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. त्याचवेळी बाखमत शहरातील लढाईतही युक्रेनी लष्कराची मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त अमेरिकी दैनिकाने दिले. याच पार्श्वभूमीवर अमेरिका युक्रेनला ‘ग्राऊंड लाँच्ड् स्मॉल डायमीटर बॉम्ब्स’ देण्याचा विचार करीत असल्याचे बायडेन प्रशासनातील सूत्रांनी म्हटले आहे.

१००हून अधिक युक्रेनमधील कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन युद्धाची गती मंदावेल, असे दावे विश्लेषकांकडून करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात रशियाने हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर रशियाने डोन्बास, खेर्सनसह मध्य युक्रेनलाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली. गेल्या ४८ तासांमध्ये रशियाने डिनिप्रो शहरावर जोरदार हल्ले केले असून त्यात लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात युक्रेनी लष्कराची सशस्त्र वाहने व इतर शस्त्रसाठा उद्ध्वस्त करण्यात आला. हल्ल्यांमध्ये युक्रेनचे लष्करी तळ तसेच कमांड पोस्ट्सनाही लक्ष्य करण्यात आले. त्यात युक्रेनी लष्कराचे १००हून अधिक जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

डोन्बासमधील बाखमत शहरातही रशियन फौजांनी आगेकूच केल्याची माहिती स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. बाखमतमध्ये रशिया व युक्रेनच्या लष्करात झालेल्या संघर्षात युक्रेनी लष्कराची मोठी जीवितहानी झाली आहे. अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले. याव्यतिरिक्त खेर्सन व झॅपोरिझिआमध्ये युक्रेनी फौजांचे आघाडी घेण्याचे प्रयत्न रशियन लष्कराने हाणून पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. डोन्बासमधील ‘स्वातोव-क्रेमिना’ आघाडीवरही रशियन फौजांकडून हल्ले सुरू आहेत.

रशियाकडून ॲव्हडिव्हका व कुपिआन्स्कमध्ये तोफा व रॉकेट्सचा मारा करण्यात येत असल्याचे युक्रेनच्या संरक्षण विभागाने सांगितले. अमेरिकी नेतृत्त्वाला युक्रेन अथवा युक्रेनमधील जनतेची चिंता नसून रशियाला कमकुवत करणे या एकमेव उद्देशाने रशिया-युक्रेन युद्धाला अधिकाधिक चिथावणी दिली जात आहे, असा आरोप अमेरिकेचे माजी वरिष्ठ अधिकारी पॉल क्रेग रॉबर्टस्‌‍ यांनी केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info