कोरोनाव्हायरसच्या साथीचे भयंकर थैमान – इटलीत एकाच दिवसात ४७५ जणांचा बळी; अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर

कोरोनाव्हायरसच्या साथीचे भयंकर थैमान – इटलीत एकाच दिवसात ४७५ जणांचा बळी; अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर

वॉशिंग्टन/रोम/लंडन, दि. १९ (वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसच्या जगभरातील बळींची संख्या ९,२७६ वर गेली आहे. इटलीत एकाच दिवसात ४७५ जणांचा बळी गेल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात चीनमध्येही या साथीचे बळी गेले नव्हते, असे सांगितले जाते. या रुग्णांचे शव लष्करी वाहनातून दफनासाठी न्यावे लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. तर पोर्तुगालने या साथीमुळे आणीबाणी घोषित केली आहे. या साथीच्या विरोधात युद्ध सुरू असून आपण आता युद्धकाळातील राष्ट्राध्यक्ष बनलो आहोत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. तसेच या साथीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ५०० अब्ज डॉलर्सचे पॅकेज घोषित केले आहे.

इटली हे कोरोनाव्हायरसच्या साथीचे दुसरे केंद्र बनले आहे. एकाच दिवसात इटलीमध्ये ४७५ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यानंतर इटलीच्या सरकारने आपल्या देशातील लॉकडाऊनची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यापर्यंत हे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे इटलीने घोषित केले. आत्तापर्यंत इटलीमध्ये या साथीचे २९७८ बळी गेले असून ३५ हजाराहून अधिकजणांना याची लागण झालेली आहे. या साथीची लागण झालेल्यांमध्ये २६२९ डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. इटलीसह इतर युरोपिय देशांमध्येही ही साथ झपाट्याने फैलावत असून जर्मनीमध्ये या साथीचे १३ हजाराहून अधिक तर स्पेनमध्ये १७ हजार रुग्ण आढळले आहेत. पोर्तुगालमध्ये याचे ७८५ रुग्ण आढलल्यानंतर या देशाने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.

युरोपियन सेंट्रल बँकेने या साथीच्या पार्श्‍वभूमीवर ७५० अब्ज युरो इतकी ‘पॅनडेमिक इमर्जन्सी बॉंड बाईंग स्किम’ अर्थात सरकारी व खाजगी कंपन्यांचे कर्जरोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपिय देशांना या साथीचा जबरदस्त आर्थिक फटका बसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या साथीचा सामना करण्यासाठी सुमारे ५०० अब्ज डॉलर्सचा मोठा निधी घोषित केला. ‘चायनिज व्हायरस’मुळे अमेरिकेचे उद्योगक्षेत्र प्रभावित झाले आहे. तुमची काहीही चूक नसताना, या चायनिज व्हायरसमुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असे टोले ट्रम्प यांनी लगावले. मात्र अशा परिस्थिती अमेरिकेचे सरकार तुम्हाला वार्‍यावर सोडणार नाही, लवकरच तुमच्यापर्यंत सहाय्य पोहोचेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

त्यानुसार ट्रम्प यांनी या ५०० अब्ज डॉलर्सच्या पॅकेजची घोषणा केली. अमेरिकन संसदेच्या दोन सदस्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेत या साथीने १५५ जणांचा बळी घेतला असून नऊ हजाराहून अधिकजणांना याची लागण झाली आहे.

रशियातही कोरोनाव्हायरसने पहिला बळी घेतला. गेल्या ५० वर्षातील ही सर्वात भयंकर साथ असल्याचे रशियन सरकारने म्हटले आहे. रशियात या साथीची लागण?झालेल्यांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. रशियाने परदेशींना १ मेपर्यंत प्रवेशबंदी करून ही साथ रोखण्याचे शक्य तितके प्रयत्न केले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info