Breaking News

कोरोनाच्या साथीमुळे अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा नवा भडका

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरस साथीचा फैलाव वाढत असताना अमेरिका व चीनमध्ये सुरू असणाऱ्या व्यापारयुद्धाचाही तीव्र भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर नवे व्यापारी कर लादण्याची धमकी दिली असून चीनबरोबर नवा करार करणे शक्य नाही, असे बजावले आहे. ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागारांनीही कर लादण्याच्या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीचा अमेरिकेला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. निवडक उद्योग व कंपन्या वगळता अमेरिकेतील बहुतांश औद्योगिक हालचाल थंडावली असून बेकारी विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचली आहे. अर्थव्यवस्थेचा विकासही पूर्णपणे थांबला असून ती पूर्वपदावर येण्यास किमान एक ते दीड वर्ष लागण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. या आर्थिक तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीसाठी चीनच जबाबदार असल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व अमेरिकन नेतृत्व चीनविरोधात आक्रमक झाले आहे.

ट्रम्प व प्रशासनातील इतर नेते गेले काही आठवडे सातत्याने चीनला धारेवर धरत आहेत. काही दिवसांपूर्वी, कोरोनाव्हायरसची माहिती दडवून चीनने अमेरिकेची जबर जीवित व आर्थिक हानी केली आहे. या हानीची चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला किंमत चुकती करावीच लागेल, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला होता. ही किंमत आर्थिक व व्यापारी स्तरावर असेल, असे स्पष्ट संकेत परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिले होते. त्यापुढे जाऊन आता चीनवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी केलेली वक्तव्ये त्याला पुष्टी देणारी ठरतात.

अमेरिका व चीनमध्ये गेली दोन वर्षे सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला तात्पुरता अल्पविराम देणाऱ्या कराराची बोलणी अंतिम टप्प्यात होती. मात्र कोरोना साथीमुळे बोलणी थंडावली असून चीन ती पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहे. पण अमेरिका त्यासाठी उत्सुक नसून उलट नवे कर लादण्याची तयारी करीत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी एका मुलाखतीत, कराराची शक्यता पूर्णपणे फेटाळून चीनला नव्या व्यापारी करांची धमकी दिली.

ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नॅव्हॅरो यांनी याबाबत अधिक पुढे जाऊन अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी उघडपणे, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या लपवाछपवीची किंमत चुकवण्याची वेळ आली आहे, असा खरमरीत इशारा दिला. हा मुद्दा फक्त चीनला शिक्षा करण्याशी संबंधित नाही तर त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यकच बनले आहे, अशा शब्दात नॅव्हॅरो यांनी चीनविरोधात कारवाईचे संकेत दिले.

हिंदी   English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info