वॉशिंग्टन – चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप अमेरिकी विश्लेषक गॉर्डन चँग यांनी केला. चीनच्या या कारवायांमुळे पुढील काळात अमेरिका व चीनमधील संबंध पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही, असा दावाही चँग यांनी केला. कोरोना साथीच्या मुद्द्यावर चीनने जे धोरण राबविले त्यामुळे चीन संपूर्ण मानवजातीचा गुन्हेगार ठरतो, अशी जळजळीत टीकाही चँग यांनी केली आहे.
चीन मधून सुरुवात झालेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीने गेले पाच महिने जगभरात हाहाकार उडविला आहे. आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे साडेतीन लाखांहून अधिक जणांचे बळी गेले असून ५७ लाखांहून अधिकांना साथीचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये ही साथ आल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने त्याबाबत सातत्याने लपवाछपवी केली. चीनने केलेल्या फसवणुकीमुळे जगातील इतर देशांना साथीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले व प्रचंड हानी सोसावी लागली. त्यामुळे जगभरात चीनविरोधात तीव्र असंतोषाची भावना असून हा असंतोष वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहे. अमेरिकी विश्लेषकांनी केलेला आरोपही त्याचाच भाग ठरतो.
गॉर्डन जी. चँग हे चिनी वंशाचे अमेरिकी नागरिक असून लेखक, कायदेतज्ञ व राजकीय विश्लेषक म्हणून कार्यरत आहे. ‘द डेली बीस्ट’ या वेबसाइटसाठी स्तंभ लेखक म्हणून काम केलेल्या चँग यांचे ‘द कमिंग कोलॅप्स ऑफ चायना’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त ते ‘फॉक्स न्यूज’ तसेच ‘सीएनएन’ या वृत्तवाहिन्यांसाठी विश्लेषक म्हणून काम करतात.
‘चीनमध्ये कोरोनाव्हायरस साथीमुळे होणारे नुकसान पाहिल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने जाणूनबुजून जगातील इतर देशांच्या विरोधात द्वेष व आकसाची भावना ठेवून ही साथ सर्व देशांमध्ये फैलावून दिली. साथीच्या माध्यमातून चीनने जगातील इतर सर्व देशांवर हल्ला घडविण्याच्या उद्देशाने ही पावले उचलली व त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. कोरोनाची साथ प्रयोगशाळेतून पसरली अथवा बाजारपेठेतून हे महत्त्वाचे नसून चीनने त्यानंतर त्याचा कसा वापर केला हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मनात नक्की काय चालले होते हे कोणालाच माहीत नाही. पण त्यांनी इतर देशांची अवस्था वाईट व्हावी, याच हेतूने साथ चीनच्या सीमेबाहेर पसरू दिली’, अशा घणाघाती शब्दात चँग यांनी चीनवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
कोरोनाव्हायरसची साथ सुरू झाल्यानंतर चीनच्या सत्ताधारी राजवटीचे वर्तन अत्यंत बेपर्वाईचे होते आणि ही राजवट सातत्याने जगाची दिशाभूल करीत राहिली, असा दावाही अमेरिकी विश्लेषकांनी केला. कोरोना प्रकरणात चीनने केलेल्या निंदनीय कृत्यांना ‘डब्ल्यूएचओ‘ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ ची साथ होती. ‘डब्ल्यूएचओ’च्या एका डॉक्टरने १४ जानेवारी रोजी कोरोनाचा संसर्ग माणसांमधून पसरतो, अशी माहिती दिली होती. मात्र वरिष्ठांकडून या डॉक्टरचा आवाज दाबण्यात आला, याकडे चँग यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व सहकारी नेत्यांनी कोरोनाव्हायरसच्या मुद्द्यावरुन सातत्याने चीनला धारेवर धरले आहे. ट्रम्प प्रशासनासह आघाडीच्या देशांनी आणलेल्या दडपणामुळे ‘डब्ल्यूएचओ’ला कोरोना साथीच्या मुद्द्यावर स्वतंत्र चौकशीची मागणी मान्य करणे भाग पडले होते. चीनचे एकेकाळचे सहकारी व भागीदार असणाऱ्या देशांनीही कोरोनाच्या मुद्द्यावर चीनविरोधात आक्रमक सूर लावून धरला आहे. यात राजकीय नेतृत्वाबरोबरच राजनैतिक अधिकारी, विश्लेषक व तज्ञांचा ही समावेश असून चँग यांनी केलेले आरोप, जगभरात चीनविरोधात दाटून आलेल्या जनभावनेचे प्रतीक ठरत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |