सिरियामध्ये अमेरिकेची पॅट्रियॉट यंत्रणा तैनात

दमास्कस – अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या ताब्यातील इंधनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने ही तैनाती केली आहे. येत्या काही दिवसात अमेरिका आणखीन काही पॅट्रियॉट मिसाईल सिस्टिम सिरियात तैनात करणार असल्याचा दावा, सिरियातील सरकारी वृत्तसंस्थेने केला. मात्र या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे सांगून अमेरिकेने आपली पॅट्रियॉट यंत्रणा सिरियात नसल्याचे म्हटले आहे.

सिरियाच्या ईशान्येकडील ‘देर अल-झोर’ या प्रांतात अमेरिकेने पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणेच्या तीन बॅटरीज उतरविल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्थेने केला. कोनीको इंधन प्रकल्पाचा हद्दीत अमेरिकेने ही तैनाती केली आहे. सिरियातील सर्वात मोठ्या इंधन प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोनीको या प्रकल्पावर ‘वायपीजी’ या सिरियन कुर्दांच्या संघटनेचे वर्चस्व असून अमेरिकेने कुर्दांना सहाय्य करण्यासाठी ही तैनाती केल्याचा दावा सदर वृत्तसंस्थेने केला. देर अल-झोर या प्रांतातील अमेरिकेच्या पॅट्रियॉट यंत्रणेची ही पहिली तैनाती असून येत्या काळात अमेरिका आणखीन तीन यंत्रणा सदर प्रांतातील कुर्दांच्या इंधन तळांवर तैनात करणार असल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला आहे.

सिरियन तसेच इराणी वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या या बातमीचा अमेरिकेने इन्कार केला. अमेरिकेने सिरियामध्ये कुठल्याही प्रकारची हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली नसल्याची माहिती सिरियातील अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल माईल्स कॅगिन्स यांनी दिली. सिरियात अमेरिकेच्या लष्कराविरोधात खोट्या बातम्या पसरविल्या जात असून सदर बातमी देखील त्याचाच एक भाग असल्याचा आरोप कर्नल कॅगिन्स यांनी केला. याआधी इराकमधील शस्त्रसाठा अमेरिका सिरियात हलवीत असल्याच्या बातम्या सिरियन तसेच इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या, याची आठवण अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते कॅगिन्स यांनी करुन दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये सिरियातील घडामोडींनी वेग घेतला आहे. सिरियाच्या ईशान्येकडील अल-हसाका आणि देर अल-झोर या दोन प्रांतांच्या सीमेजवळ झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक आणि पाच कुर्द जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिका आणि कुर्द जवान संयुक्तरित्या गस्त घालत असताना त्यांच्या वाहनावर बॉम्बहल्ला झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या अमेरिकी सैनिकांना अल-हसाका प्रांतातील सदादी येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर नेण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. पण तुर्कीसंलग्न दहशतवादी गट या हल्ल्यामागे असल्याचा दावा केला जातो. त्याचवेळी अमेरिकी आणि रशियन लष्कराने तुर्कीच्या सीमेजवळ संयुक्त गस्त सुरू केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info