गुआम – चीनकडून ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रासह हॉंगकॉंग व तैवानवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी निर्णायक हालचाली सुरू केल्या आहेत. एकाच वेळी अमेरिकेच्या तीन अजस्त्र विमानवाहू युद्धनौका चीननजीकच्या सागरी क्षेत्रात दाखल होत असून बॉम्बर्स व स्पाय ड्रोन्सही तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या हालचाली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनविरोधात सुरू केलेल्या आक्रमक धोरणाचा पुढचा टप्पा असल्याचे मानले जाते.
जगभरात फैलावणाऱ्या कोरोनाव्हायरस साथीचा मोठा फटका अमेरिकेच्या संरक्षणदलाही बसला आहे. अमेरिकेच्या विविध संरक्षणतळावरील अधिकारी तसेच जवानांना कोरोनाची लागण झाली असून नियमित मोहिमा व सरावही पुढे ढकलण्यात आले आहेत. पॅसिफिक क्षेत्रात तैनात असणाऱ्या अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौकांनाही त्यांच्या तळावर माघारी परतून थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. अमेरिकेच्या संरक्षण दलाच्या या कमकुवत स्थितीचा फायदा उचलून चीनच्या राजवटीने तैवानवर आक्रमण करून तो ताब्यात घ्यावा असे सल्लेही चीनमधून देण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या तीन विमानवाहू युद्धनौका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दाखल होणे महत्त्वाचे ठरते.
अमेरिकेचा पॅसिफिक क्षेत्रातील तळ गुआमवर तैनात असणारी ‘युएसएस थिओडोर रुझवेल्ट’ गेल्याच आठवड्यात पॅसिफिक क्षेत्राच्या मोहिमेसाठी रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. सध्या ही विमानवाहू युद्धनौका फिलिपाईन्स सी नजिकच्या क्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या सॅन डिएगो बंदरात तैनात असणारी ‘युएसएस निमित्झ’ ८ जून रोजी पॅसिफिक मोहिमेसाठी निघाल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. जपानमध्ये तैनात असणारी विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रीगन’नेही ८ जूनलाच जपानी बंदर सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीन विमानवाहू युद्धनौकांसह त्यांच्या ‘कॅरिअर ग्रुप’चा भाग असलेल्या ३० हून अधिक युद्धनौका, १५० पेक्षा जास्त लढाऊ विमाने आणि सुमारे २० हजार जवान ‘इंडो-पॅसिफिक‘ क्षेत्रात दाखल झाले आहेत. या तीनही विमानवाहू युद्धनौका किती काळासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनात राहतील याची कोणतीही माहिती अमेरिकी संरक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. एकाच वेळी तीन विमानवाहू युद्धनौका इंडो पॅसिफिक क्षेत्रात तैनात असण्याची गेल्या तीन वर्षातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
तीन विमानवाहू युद्धनौकांबरोबरच अमेरिकेच्या संरक्षण दलाने ‘बी-१बी लान्सर बॉम्बर्स’ तसेच ‘ग्लोबल हॉक स्पाय ड्रोन्स’देखील इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. ‘बी-१बी लान्सर बॉम्बर्स’ गुआममधील तळावरून नियमित रूपाने साऊथ चायना सी व इतर नजीकच्या क्षेत्रावर घिरट्या घालीत आहेत. तर ‘ग्लोबल हॉक स्पाय ड्रोन्स’ जपानमधील ‘योकोटा’ हवाईतळावर तैनात करण्यात आली आहेत. ही तैनाती अमेरिकेच्या हवाईदलाकडून करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यात चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात जोरदार कारवाया सुरू आहेत. शेजारील देशांच्या नौका बुडविणे, सागरी हद्दीत घुसखोरी करणे व लष्करी सामर्थ्याच्या बळावर धमकावणे यासारखे उद्योग सातत्याने सुरू आहेत. त्यात हॉंगकॉंगवर ताबा मिळवण्यासाठी आणलेला कायदा आणि तैवानवरील आक्रमणाच्या धमक्या यांची भर पडली आहे. साऊथ चायना सी क्षेत्रावरील वर्चस्वासाठी चीन ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ लागू करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून सुरू झालेल्या या आक्रमक कारवायांना रोखण्यासाठी अमेरिका सरसावली असून विमानवाहू युद्धनौकांसह बॉम्बर्स व ड्रोन्सची तैनाती निर्णायक हालचालींचे संकेत देणारी ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |