मॉस्को – अमेरिका व नाटो सदस्य देशांनी रशियाच्या सीमेनजीक सुरू केलेल्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने बाल्टिक क्षेत्रात लष्करी सरावाचे आयोजन केले आहे. रशियाने सुरू केलेल्या सरावात, सुखोई लढाऊ विमाने व इस्कंदर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. हा सराव सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे भेदू शकेल अशी यंत्रणा लवकरच रशियन संरक्षणदलांमध्ये दाखल होईल, असा दावा केला.
गेल्या काही दिवसात अमेरिका व नाटो सदस्य देशांनी रशियन सीमेनजीक असलेल्या क्षेत्रातील हालचाली वाढविल्या आहेत. अमेरिका व नाटो सदस्य देशांनी एकाच वेळी दोन युद्धसरावांना सुरुवात केली असून त्यात सुमारे १० हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे. पोलंडमध्ये ५ जूनला अमेरिका व पोलंड या दोन देशांचा ‘डिफेंडर युरोप २०’ हा युद्धसराव सुरू झाला असून यात दोन्ही देशांचे मिळून सहा हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. त्याव्यतिरिक्त १०० हून अधिक रणगाडे आणि २३० हून अधिक सशस्त्र वाहने व यंत्रणा यांचाही सरावात समावेश आहे.
या सरावापाठोपाठ सोमवारी ७ जूनला अमेरिकेने १७ नाटो सदस्य देशांसह ‘बाल्टॉप्स २०’ या भव्य नौदल सरावाला सुरुवात केली. या सरावात २८ युद्धनौका व २५ पेक्षा जास्त लढाऊ विमानांसह तीन हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे. ‘डिफेंडर युरोप २०’ व ‘बाल्टॉप्स २०’ हे दोन्ही युद्धसराव या आठवड्याच्या अखेरपर्यंत चालू राहतील अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. कोरोना साथीचे संकट अधिक तीव्र होत असतानाच त्याचा सर्वाधिक फटका बसलेला अमेरिका व युरोपीय देशांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
अमेरिका व नाटोच्या या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानेही बाल्टिकमध्ये लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. पोलंडच्या सीमेनजीक असलेल्या कॅलिनिनग्रॅड या संरक्षणतळावर तसेच बाल्टिक सागरी क्षेत्रात हा सराव सुरू करण्यात आला आहे. रशियाने सुरू केलेल्या या सरावात, ‘सुखोई-३०’, ‘सुखोई-२७’ व ‘सुखोई-२४’ या लढाऊ विमानांसह ‘इस्कंदर’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
अमेरिका व नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाकडून सरावाचे आयोजन करण्यात आले असतानाच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नवा इशारा दिला आहे. ‘जगातील इतर देशांकडून तैनात करण्यात येणाऱ्या हायपरसोनिक अण्वस्त्रांना भेदेल अशी यंत्रणा रशियन संरक्षणदलांमध्ये लवकरच सामील होऊ शकते’, असे पुतीन यांनी बजावले. रशियाने गेल्या वर्षीच आपल्या संरक्षणदलात हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. अमेरिका व चीनने देखील आपल्याकडे हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तयार असल्याचे दावे केले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |