युक्रेनच्या नाटोमधील सहभागाने महायुद्धाचा भडका उडेल

- झेलेन्स्की यांच्या हालचालींवर विश्लेषकांनी दिलेला इशारा

किव्ह – लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआ हे प्र्रांत युक्रेनपासून तोडून रशियन संघराज्याला जोडल्यानंतर, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र व्लादिमिर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत, या देशाशी चर्चा शक्य नाही, अशी घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या चार प्रांतांबाबत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी ‘अप्लाय’ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. युक्रेनच्या सरकारने या बातम्यांना दुजोरा दिला आहे. मात्र युक्रेनचा नाटोतील सहभाग म्हणजे महायुद्धाची घोषणाच ठरेल, असे विश्लेषक बजावत आहेत.

नाटोमधील सहभागाने, युक्रेनच्या

गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेनच्या युद्धाचे पारडे फिरले आणि युक्रेनी लष्करासमोर रशियन सैन्याला माघार घ्यावी लागल्याचे चित्र दिसत होते. यामुळे युक्रेनच्या लष्कराबरोबच युक्रेनी राष्ट्राध्यक्षांचा आत्मविश्वास वाढला होता. पण लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआमध्ये सार्वमताची घोषणा करून रशियाने लष्करी आघाडीवर युक्रेनला मिळत असलेल्या यशाची हवाच काढून घेतली. या सार्वमताच्या निकालानुसार इथल्या जनतेला रशियात सहभागी व्हायचे आहे, असे जाहीर करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी हे प्रांत युक्रेनपासून तोडून त्यांचा रशियन संघराज्यात समावेश करून टाकला. यामुळे खवळलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू करून रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

युक्रेनचा नाटोतील सहभाग हे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे प्रमुख कारण होते. युद्ध सुरू असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोमध्ये सहभागी होण्याची केलेली तयारी ही फार मोठी बाब ठरते. युक्रेनचा नाटोतील सहभाग म्हणजे महायुद्धाची घोषणाच ठरेल, असे काही विश्लेषकांनी बजावले आहे. एकदा का युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाला तर स्वीडन, फिनलँड यांच्यासह रशियाच्या प्रभावक्षेत्रातील इतर देश देखील नाटोमध्ये सहभागी होऊ शकतील. यामुळे नाटोला या देशांमध्ये आपली क्षेपणास्त्रे तसेच सैन्य देखील तैनात करणे सोपे जाईल. काहीही झाले तरी रशिया आपल्या सुरक्षेशी निगडीत ही जोखीम पत्करणार नाही. याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, असे रशियाने याआधीच जाहीर केले होते. याविरोधात अण्वस्त्रांचा वापर करावा लागला, तरी रशिया कचरणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एकदा नाही, तर अनेकदा बजावले होते. तसेच आपण देत असलेली ही धमकी पोकळ नसल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

अशा परिस्थितीत युक्रेनने नाटोमधील सहभागासाठी सुरू केलेले प्रयत्न म्हणजे महायुद्धाची घोषणा ठरेल, हा विश्लेषक करीत असलेला दावा लक्षणीय ठरतो. यावर रशियाकडून जहाल प्रतिक्रिया अपेक्षित आहे. लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅरोरिझिआ यांच्या रशियन संघराज्यातील समावेशानंतर या प्रांतांवर हल्ला युक्रेनी लष्कराने चढविला, तर तो रशियन भूभागावरील हल्ला मानला जाईल, असे रशियन नेत्यांनी आधी बजावले होते. यानंतर रशियाचे प्रत्युत्तर अगदी निराळे असेल, याचीही जाणीव रशियन नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी करून दिली होती. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून रशियन सैन्याच्या विरोधात फार मोठे यश मिळवणाऱ्या युक्रेनसमोर आता गंभीर आव्हान खडे ठाकले आहे. रशियाच्या या इशाऱ्यानंतरही युक्रेनी लष्कराने आपली आगेकूच सुरू ठेवून रशियाने आपला म्हणून घोषित केलेल्या भूभागावर हल्ला चढविलाच, तर त्याची जबर किंमत युक्रेनला मोजावी लागेल. त्यामुळे युक्रेनी लष्कराच्या हालचालींवर यापुढे फार मोठ्या मर्यादा येऊ शकतात. अन्यथा युक्रेनचे युद्ध येत्या काही दिवसातच भयंकर स्वरूप धारण करील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

English     हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info