तेहरान – दोन दिवसांपूर्वी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या संशयास्पद आगीसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. या आगीमुळे इराणचा अणुकार्यक्रम किमान दोन महिन्यांसाठी पिछाडीवर पडल्याचा दावा केला जातो. तर गेल्या आठवड्यात इराणच्या क्षेपणास्रतळावर झालेल्या भीषण स्फोटामागेही इस्रायल असल्याचे आखातातील एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. अवघ्या आठवड्याभरात घडलेल्या या दोन घटनांमुळे इराण खवळला असून या हल्ल्यामागे इस्रायल असल्याचे सिद्ध झाल्यास इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी इराणने दिली आहे. दरम्यान, इस्रायलने नेहमीप्रमाणे माध्यमातून होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
गुरुवारी पहाटे इराणच्या नातांझ येथील भुयारी अणुप्रकल्पात संशयास्पदरित्या स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत सदर अणुप्रकल्पाच्या इमारतीच्या छपराचे नुकसान झाल्याची माहिती इराणच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. पण इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या फोटोग्राफ्स आणि व्हिडिओनंतर या अणुप्रकल्पाचे जबर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अणुप्रकल्पाच्या इमारतीचा मुख्य दरवाजा यात नष्ट झाल्याचे उघड झाल्यानंतर ही दुर्घटना नसून हल्ला होता, असा आरोप आखातातील एका वर्तमानपत्राने केला आहे. इस्रायलने सायबर हल्ल्याद्वारे नातांझ अणुप्रकल्पाला लक्ष केल्याचा आरोप सदर वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी इराणच्या अणुकार्यक्रमावर झालेल्या ‘स्टक्सनेट’च्या हल्ल्याचा दाखला सदर वर्तमानपत्रांनी दिला आहे.
२०१० साली इराणच्या नातांझ आणि बुशहेर या दोन अणुप्रकल्पांवर स्टक्सनेट या व्हायरसचे हल्ले झाले होते. या हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पातील ६० टक्के कम्प्युटर्स आणि संबंधित यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडल्या होत्या. या सायबर हल्ल्यामुळे काही हजार सेंट्रीफ्यूजेस निकामी होऊन इराणचा अणुकार्यक्रम सहा वर्षांसाठी पिछाडीवर गेला होता. आपल्या अणुकार्यक्रमावर झालेल्या सायबर हल्ल्यासाठी इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद आणि अमेरिका जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. आताही स्टक्सनेट प्रमाणेच नातांझ अणुप्रकल्पावर सायबरहल्ले झाल्याचे आखाती वर्तमानपत्राने म्हटले आहे. इराणने या हल्ल्याची व्याप्ती उघड केलेली नाही. पण किमान दोन महिन्यांसाठी इराणचा अणुकार्यक्रम बाधित झाल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इराणने नातांझ अणुप्रकल्पात सेंट्रीफ्यूजेसच्या प्रगत आवृत्तीवर काम सुरू केले होते. अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यानंतर आणि निर्बंध लादल्यानंतर इराणने आपल्या अणुप्रकल्पातील सेंट्रीफ्यूजेसची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. नातांझ अणुप्रकल्पात या सेंट्रीफ्यूजेसची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्यामुळे येथे झालेल्या सायबर हल्ल्याने इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा आघात केल्याचा दावा केला जातो. या सायबर हल्ल्याने इराणचा अणुकार्यक्रम आणखी काही वर्षांसाठी पिछाडीवर गेल्याची शक्यताही वर्तविली जाते. नातांझ अणुप्रकल्पावरील हल्ल्याबरोबरच गेल्या आठवड्यात पारचीन येथील क्षेपणास्त्र तळावर झालेल्या स्फोटामागेही इस्रायलच असल्याचा आरोप सदर वर्तमानपत्राने केला.
राजधानी तेहरानपासून जवळच असलेल्या पारचीन शहरातील इराणी लष्कराच्या सर्वात महत्त्वाच्या क्षेपणास्त्र तळावर भीषण स्फोट झाला होता. इराणच्या लष्कराने सुरुवातीला येथील गॅसटँकमध्ये स्फोट झाल्याचे जाहीर केले होते. पण या स्फोटाचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर इराणचे लष्कर महत्त्वाची माहिती दडवित असल्याचे बोलले जात होते. त्यात आता आखाती वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात इस्रायलच्या एफ३५ स्टेल्थ विमानांनी पारचीन तळावरील क्षेपणास्त्रांच्या साठ्यावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा नष्ट झाल्याचा दावा केला जातो. इराणच्या लष्करासाठी हा सर्वात मोठा हादरा असल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे.
गेल्या आठवडाभरात घडलेल्या घटनांमागील कारण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती इराणने दिली आहे. अणुप्रकल्पावरील हल्ल्यामागे इस्रायल असल्याचे उघड झाले, तर त्यासाठी इस्रायला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने बजावली आहे. दरम्यान, इस्रायलने या सर्व प्रकरणांबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |