वॉशिंग्टन – ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला कोणत्याही मार्गाने अमेरिकेला धक्का देऊन जगातील एकमेव महाशक्ती बनायचे आहे. त्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून अमेरिकेतील प्रत्येक क्षेत्रात कारवाया सुरू असून या कारवाया अमेरिकेसाठी सर्वात मोठा दीर्घकालीन धोका ठरतात’, अशा शब्दात अमेरिकी तपास यंत्रणा ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाया व धोक्याची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे, असे बजावले होते.
जगभरात लाखो बळी घेणाऱ्या कोरोना साथीमागे चीनच सूत्रधार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेतला असून जगातील इतर देशांनाही कोरोनासह इतर चिनी धोक्यांची जाणीव करून देण्यात येत आहे. चीनच्या अमेरिकेतील कारवाया रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक महत्त्वाचे व मोठे निर्णय घेतले असून अमेरिकी जनतेला चीनच्या कारस्थानाची माहिती करून देण्यासाठी प्रचार मोहीम आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन चीनबाबतची भूमिका मांडत आहेत. एफबीआय प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी ‘हडसन इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात केलेले वक्तव्य त्याचाच भाग आहे.
अमेरिकेला असलेल्या चीनच्या धोक्याबाबत बोलताना, हा धोका चीनच्या जनतेपासून नसून अमेरिकेतील कारवायांमागे चीनची सत्ताधारी राजवट व कम्युनिस्ट पार्टी असल्याचे एफबीआय प्रमुखांनी स्पष्ट केले. त्याचवेळी चीनपासून असलेला धोका हा फक्त हेरगिरीच्या कारवाया, सरकारी समस्या किंवा बड्या कंपन्यांपुरता मर्यादित नसून त्याचा संबंध थेट अमेरिकी जनतेच्या जीवनाशी आहे, अशा शब्दात ख्रिस्तोफर रे यांनी, चीनकडून असलेल्या धोक्याची व्याप्ती खूपच मोठी असल्याचे बजावले. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी २०१७ साली चिनी हॅकर्सनी अमेरिकेच्या ‘इक्विफॅक्स’ या कंपनीवर चढविलेला सायबरहल्ला आणि कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या कारवाया यांचा उल्लेख केला.
एफबीआयचे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी, चीनच्या धोक्याकडे लक्ष वेधताना तीन गोष्टींवर भर दिला. त्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीची जगातील एकमेव महाशक्ती बनण्याची महत्त्वाकांक्षा, त्यासाठी सायबरहल्ल्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याची क्षमता आणि अमेरिका व चीनच्या मूलभूत व्यवस्थांमध्ये असणारा फरक यांचा समावेश आहे. चीनकडून अमेरिकेत सुरू असणाऱ्या कारवायांची व्याप्ती स्पष्ट करताना त्यांनी एफबीआयकडे असणाऱ्या प्रकरणांची माहिती दिली.
‘अमेरिकेतील प्रमुख तपासयंत्रणा असणाऱ्या एफबीआयकडे दर १० तासांनी चीनच्या कारवायांशी संबंधित प्रकरणाची नोंद होत आहे. सध्या एफबीआयकडे चीनशी निगडीत सुमारे दोन हजारांहून अधिक प्रकरणे असून त्यात सातत्याने भर पडते आहे’, असे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी सांगितले. कम्युनिस्ट राजवटीच्या कारवायांची माहिती देताना त्यांनी ‘थाउजंड टॅलेंटस प्रोग्राम’ व ‘ऑपरेशन फॉक्सहंट’ यांचा विस्ताराने उल्लेख केला.
थाउजंड टॅलेंट प्रोग्रामच्या माध्यमातून चीनची कम्युनिटी राजवट, हजारो चिनी विद्यार्थी व संशोधकांना अमेरिकेत शिक्षणासाठी धाडते. या विद्यार्थी व संशोधकांना अमेरिकेतील संवेदनशील क्षेत्रांमध्ये सुरू असणाऱ्या संशोधनाची माहिती चीन सरकारला देणे बंधनकारक केले आहे. ऑपरेशन फॉक्सहंटच्या माध्यमातून चीनचे सत्ताधारी परदेशात वास्तव्यास असणाऱ्या आपल्या विरोधक तसेच टीकाकारांना लक्ष्य करीत असल्याचे एफबीआयच्या प्रमुखांनी सांगितले. यावेळी ख्रिस्तोफर रे यांनी हुवेईसारख्या चिनी कंपनीकडून अमेरिकी जनतेला असणारा धोका व त्याविरोधात करण्यात आलेली कारवाई यांचे महत्वही अधोरेखित केले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे सहकारी सातत्याने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला लक्ष्य करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः, चीनमुळेच अमेरिका व जगाचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता एफबीआयच्या प्रमुखांनी पुन्हा एकदा चीनच्या वाढत्या धोक्याची स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून चीनवर एकामागोमाग चढविण्यात येणारे हे हल्ले अमेरिका व चीन मधील राजनैतिक युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत झाल्याचे संकेत देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |