‘साऊथ चायना सी’वरील चीनचे सर्व दावे बेकायदेशीर – ऑस्ट्रेलियाची घोषणा

‘साऊथ चायना सी’वरील चीनचे सर्व दावे बेकायदेशीर – ऑस्ट्रेलियाची घोषणा

कॅनबेरा – ‘साऊथ चायना सी क्षेत्रातील विविध भागांबाबत चीनकडून करण्यात येणारे सर्व दावे ऑस्ट्रेलिया धुडकावत आहे. ऐतिहासिक व सागरी हद्दीच्या अधिकाराच्या नावाखाली चीनकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांना कुठलाही कायदेशीर आधार नसून ते निरर्थक आहेत’, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाने चीनला नवा धक्का दिला. साऊथ चायना सीवरील चीनचे अधिकार नाकारणारा ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेपाठोपाठ दुसरा मोठा देश ठरला आहे. ऑस्ट्रेलिया चीनला धुडकावत असतानाच अमेरिकेनेही पुन्हा टीकास्त्र सोडले असून, साऊथ चायना सी हा चीनच्या सागरी साम्राज्याचा भाग नसल्याचा टोला लगावला आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपल्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडणार्‍या चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगलेच आव्हान मिळू लागले आहे. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक प्रमुख तसेच लहान-मोठे देश चीनच्या कारवायांविरोधात उघड भूमिका घेत आहेत. चीन व ऑस्ट्रेलिया या प्रमुख व्यापारी भागीदार देशांमधील तणाव गेल्या काही वर्षांपासून हळूहळू समोर येत होता. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत राजकारणातील हस्तक्षेप व सायबरहल्ले यासारख्या मुद्द्यांमुळे वाढत गेलेल्या तणावात यावर्षी कोरोना साथीची भर पडली. चीनकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्या व त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कठोर पवित्रा यामुळे दोन देशांमधील संबंध आता विकोपाला गेल्याचे दिसत आहे. साऊथ चायना सीच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे यापुढे दोन देशांमधील संबंध पूर्वपदावर येण्याची शक्यता मावळल्याचे दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रसंघाला सादर केलेल्या अधिकृत निवेदनात आपले साऊथ चायना सीबाबतचे धोरण स्पष्ट केले. ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८२च्या कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सीच्या विरोधात जाणारे चीनचे सर्व दावे ऑस्ट्रेलिया सरकार धुडकावत आहे. त्यात सागरी क्षेत्रांवर सांगितलेला अधिकार तसेच मर्यादित हद्दीबाबत केलेले दावे यांचा समावेशही आहे. साऊथ चायना सी वर आपले ऐतिहासिक अधिकार आहेत किंवा परंपरेने आपले सागरी हितसंबंध त्याच्याशी जोडलेले आहेत, अशा स्वरूपाचे चीनचे कुठलेही दावे ऑस्ट्रेलिया स्पष्टपणे नाकारीत आहे. आपल्या सागरी हद्दीच्या बाहेर असलेल्या बेटांच्या समुहावर दावे करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार चीनला नाही’, असे सांगून ऑस्ट्रेलियाने साऊथ चायना सीबाबत चीनची एकतर्फी भूमिका कधीही मान्य करण्यात येणार नाही, असे स्पष्ट शब्दात बजावले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने साऊथ चायना सीवरून आपली भूमिका स्पष्ट करताना चीनविरोधात उघड संघर्षाची भूमिका घेतली होती. अमेरिका मुक्त व खुल्या ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राचा कट्टर पुरस्कर्ता असून या क्षेत्राचा भाग असणाऱ्या साऊथ चायना सीवरील चीनचे सर्व दावे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, अशा स्पष्ट व खणखणीत शब्दात अमेरिकेने साऊथ चायना सीवरील चीनचा हक्क धुडकावला होता. त्यानंतर ब्रिटन व भारतासह आग्नेय आशियाई देशांनी अमेरिकेच्या भूमिकेचे समर्थन केले होते. मात्र धोरणात्मक पातळीवर चीनचे दावे स्पष्टपणे नाकारणारा ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आपले धोरण जाहीर करीत असतानाच अमेरिकेने पुन्हा एकदा साऊथ चायना सीबाबतच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

‘अमेरिकेचे धोरण अत्यंत स्पष्ट आहे. साऊथ चायना सी हा काही चीनच्या सागरी साम्राज्याचा भाग नाही. चीनने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले व जगातील इतर लोकशाहीवादी देशांनी काहीच केले नाही तर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट अधिकाधिक भाग गिळंकृत करेल. इतिहासाने हे दाखवून दिले आहे. साऊथ चायना सीचे सर्व वाद आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारेच सोडवायला हवेत’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. अमेरिकेसह मित्रदेश साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असताना चीननेही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

शनिवारपासून साऊथ चायना सी क्षेत्रात ‘लाईव्ह फायर ड्रिल’ सुरू केल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ग्वांगडाँग प्रांतात ह्या सरावाला सुरुवात झाली असून, त्यात युद्धनौका व लढाऊ विमानांना लक्ष्य करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या महिन्यात चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात करण्यात येणारा हा दुसरा मोठा युद्धसराव आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info