तुर्कीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रीस फ्रान्सकडून १८ रफायल खरेदी करणार – ग्रीसच्या वर्तमानपत्राची माहिती

तुर्कीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रीस फ्रान्सकडून १८ रफायल खरेदी करणार – ग्रीसच्या वर्तमानपत्राची माहिती

अथेन्स – भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रीस नव्या लढाऊ विमानांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ग्रीसच्या सरकारने फ्रान्ससह चर्चा सुरू केली असून ग्रीस १८ रफायल विमाने खरेदी करणार असल्याची माहिती स्थानिक वर्तमानपत्राने दिली. यापैकी आठ रफायल विमाने तातडीने ग्रीसमध्ये तैनात केली जातील, असा दावा केला जातो. तुर्कीच्या हवाई, नौदल तसेच विमानभेदी यंत्रणेवर फ्रान्सची रफायल विमाने सहज मात करू शकतात, असे बोलले जाते. या रफायल विमानांमुळे भूमध्य समुद्रातील युद्धाचे पारडे सहज ग्रीसच्या दिशेने झुकू शकते. या पार्श्वभूमीवर, ग्रीस व फ्रान्समधील या सहकार्यावर तुर्कीकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

१८ रफायल

ग्रीसमधील ‘पॅरापॉलिटीका’ या वर्तमानपत्राने फ्रान्सबरोबर सुरू असलेल्या चर्चेची बातमी प्रसिद्ध केली. भूमध्य समुद्रात तुर्कीने केलेली विनाशिकांची तैनाती तसेच तुर्कीच्या लढाऊ विमानांच्या घिरट्या, यामुळे सदर सागरी क्षेत्रात कमालीचा तणाव वाढला आहे. यामध्ये तुर्कीच्या अद्ययावत एफ-१६ लढाऊ विमानांचा समावेश आहे. तुर्कीच्या या तैनातीविरोधात ग्रीसनेही आपली एफ-१६ विमाने तैनात केली असून ‘संयुक्त अरब अमिरात’च्या (युएई) एफ-१६ विमानांचा ताफाही ग्रीसमध्ये दाखल झाला आहे. पण तुर्कीच्या अद्ययावत एफ-१६ विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडेही अतिप्रगत विमानांचा ताफा असावा, यासाठी ग्रीसने फ्रान्सकडून रफायल विमानांच्या खरेदीबाबत चर्चा सुरू केल्याची बातमी सदर वर्तमानपत्राने दिली. फ्रान्स देखील ग्रीसला रफायल विमाने देण्यासाठी उत्सुक असून यासंबंधीचा करार पार पडल्याची माहिती समोर येत आहे.

ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या खरेदीवर सहमती दर्शविली आहे. सदर वाटाघाटींप्रमाणे ग्रीस फ्रान्सकडून रफायल विमानांचे स्क्वाड्रन म्हणजे १८ विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये नवीन पिढीच्या रफायल ‘सी एफ ३-आर’ लढाऊ विमानांच्या खरेदीचा समावेश आहे. तर उर्वरित ८ जुन्या आवृत्तीची लढाऊ विमाने थेट फ्रान्सच्या हवाईदलाच्या साठ्यातून येईल. फ्रान्स ग्रीसला ही आठ जुन्या आवृत्तीची विमाने विनामूल्य देणार असल्याचा दावा केला जातो. सदर आठ विमाने प्रीसा रडार आणि मिका ईएम/आयआर क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील, असे बोलले जाते. त्याचबरोबर ग्रीस आपल्या ताफ्यातील २४ ‘मिराज २००० ५एमके’ विमानांचे फ्रान्सकडून आधुनिकीकरण करुन घेत आहे. यासाठीचा करार गेल्या वर्षीच पार पडला होता. ग्रीस किंवा फ्रान्सने रफायल विमानांच्या सहकार्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

१८ रफायल

दरम्यान, या रफायल विमानांचा ग्रीसच्या वायुसेनेतील समावेश तुर्कीला आव्हान देणारा ठरू शकतो. यासाठी लिबियातील संघर्षात फ्रान्सच्या रफायल विमानांनी तुर्कीच्या हवाई सुरक्षा यंत्रेणवर केलेल्या कारवाईचा दाखला ग्रीस व फ्रान्समधील विश्लेषक देत आहेत. काही आठवड्यांपूर्वी लिबियातील संघर्षात हफ्तार बंडखोरांना सहाय्य करणार्‍या फ्रान्सच्या रफायल विमानांनी लिबियन हवाई तळावर जोरदार हल्ले चढविले होते. या कारवाईत लिबियन लष्कराच्या तळावर तैनात असलेली तुर्कीची हवाई सुरक्षा यंत्रणा तसेच विमानभेदी यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. लिबियातील सराज सरकारच्या सुरक्षेसाठी तुर्कीने तैनात केलेल्या सदर यंत्रणा रफायल विमानांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचे बोलले जात होते. या घटनेनंतर फ्रान्स आणि तुर्कीतील तणावात वाढ झाली होती. अशा परिस्थितीत, फ्रान्सने ग्रीसला रफायल विमानांचा पुरवठा केल्यास भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या लष्करी हालचालींना मोठे आव्हान मिळण्याची दाट शक्यता आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info