बीजिंग/तैपेई – अमेरिकेकडून तैवानसह साऊथ चायना सी क्षेत्रात सुरू असलेल्या आक्रमक हालचाली म्हणजे चीनने पहिला हल्ला चढवावा, यासाठी देण्यात येणाऱ्या चिथावण्या आहेत असा आरोप चिनी विश्लेषकांनी केला आहे. अमेरिकेच्या लष्करी तसेच टेहळणी विमानांकडून तैवानच्या भूमीचा वापर होत असल्याचा दावाही, या विश्लेषकांकडून करण्यात आला आहे. चिनी विश्लेषक आरोप करीत असतानाच तैवान दौऱ्यावर आलेले युरोपीय नेते मिलॉस विस्त्रसिल यांनी, मी तैवानी आहे असे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. चीनचे वरिष्ठ नेते युरोप दौऱ्यावर असतानाच युरोपियन नेत्यांनी उघडपणे तैवानचे समर्थन करणारी भूमिका घेणे, हा चीनसाठी मोठा धक्का मानला जातो.
रविवारी अमेरिकेच्या विनाशिकेने तैवानच्या आखातातून गस्त घातली होती. त्यापाठोपाठ अमेरिकेचे टेहळणी विमान ‘ईपी-३ई’ तैवानच्या हवाईहद्दीत तसेच चीनच्या सीमेनजीक आढळले होते. चीनकडून सागरी क्षेत्रात सराव सुरू असतानाही अमेरिकेचे ‘स्पाय प्लेन’ लष्कराने जाहीर केलेल्या ‘नो फ्लाय झोन’मध्ये घुसले होते. चीनचा सराव सुरू असतानाही अमेरिकेच्या युद्धनौका जवळच्या सागरी क्षेत्रात तैनात करण्यात आल्या होत्या. या घटनांसह अमेरिकेच्या लढाऊ तसेच टेहळणी विमानांनी गेल्या काही महिन्यात चीनच्या हद्दीनजीक वाढवलेल्या फेऱ्यांकडे चिनी विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
अमेरिकेच्या या वाढत्या लष्करी हालचाली चीनला चिथावणी देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा चिनी विश्लेषकांनी केला आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात चीनने साऊथ चायना सी क्षेत्रात पहिला हल्ला चढवावा यासाठी अमेरिका प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या या हालचालींमुळे साऊथ चायना सी मधील तणाव चिघळत असल्याचेही ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तात बजावण्यात आले आहे. अमेरिकेच्या निर्देशानुसार तैवानमधील काही विश्लेषक तसेच तज्ञ चीनच्या लष्करी सामर्थ्याला कमी लेखणारी वक्तव्ये करीत असल्याचेही चिनी मुखपत्राच्या वृत्तात म्हटले आहे.
चिनी विश्लेषक व प्रसारमाध्यमे अमेरिकेवर आरोप करीत असतानाच, तैवान दौऱ्यावर आलेले युरोपीय शिष्टमंडळ चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीसाठी नवे आव्हान ठरले आहे. युरोपिय महासंघाचा सदस्य देश असलेल्या झेक रिपब्लिकच्या संसदेचे प्रमुख मिलॉस विस्त्रसिल शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी मंगळवारी तैवानच्या संसदेला संबोधित केले. ‘आपण तैवान व स्वातंत्र्याचे समर्थक आहोत. त्याचवेळी मी तैवानी आहे हे उपस्थितांना सांगू इच्छितो’, असे वक्तव्य करून विस्त्रसिल यांनी खळबळ उडवली.
हे वक्तव्य करताना त्यांनी दिवंगत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १९६३ साली ‘पश्चिम बर्लिन’मध्ये केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. केनेडी यांनी त्यावेळी ‘आय एम बर्लिनर’ असे उद्गार काढले होते. हे उद्गार पूर्व जर्मनीमध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापन करणाऱ्या रशियाला उद्देशून होते असे सांगण्यात येते. त्याचा संदर्भ देऊन झेक नेत्यांनी तैवानला दिलेले समर्थन लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. मिलॉस विस्त्रसिल यांच्या या खळबळजनक वक्तव्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. झेक नेत्यांनी रेड लाईन ओलांडली आहे, असा इशारा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी दिला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |