तैपेई – ‘लाईन ओलांडण्याचा प्रयत्नही करू नका. चीनच्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा तैवानची हवाईहद्द पार केल्याचे समोर आले आहे. मात्र यापुढे अशी चूक करु नका. तैवानला शांतता हवी आहे. पण त्याचवेळी आम्ही आमच्या सुरक्षेसाठी पूर्ण सज्ज आहोत’, असा खरमरीत इशारा तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लाय चिंग-टे यांनी दिला. तैवानच्या हद्दीनजिक चीनच्या संरक्षणदलांकडून व्यापक युद्धसराव सुरु आहे. या सरावादरम्यान चीनच्या लढाऊ विमानांनी सलग दोन दिवस तैवानची हवाईहद्द ओलांडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर तैवानकडून चीनला इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनची कम्युनिस्ट राजवट साऊथ चायना सी क्षेत्रातील भागांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करेल, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. त्यापूर्वी तसेच नंतरच्या काळात चीनकडून तैवानविरोधातील हालचाली जास्तच वाढल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये झालेल्या एका बैठकीत, कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तैवानवर हल्ला चढवण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची आग्रही भूमिका मांडली होती. चीनच्या तैवानविरोधातील कारवाया अधिक आक्रमक होण्यास सुरुवात झाल्याचेही गेल्या काही आठवड्यात समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या आखातात लष्करी सराव सुरू केला आहे. सार्वभौमत्वाची सुरक्षा व सज्जता या उद्देशाने सराव आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती चीनच्या प्रवक्त्यांनी दिली होती. गेल्या महिन्याभरात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवानच्या हद्दीनजीक आयोजित करण्यात आलेला हा सहावा मोठा सराव मानला जातो. या सरावात चीनची लढाऊ विमाने सातत्याने तैवानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन करीत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी तैवानच्या हवाईसुरक्षा यंत्रणेने चीनचे लढाऊ विमान पाडल्याचे दावेही माध्यमांकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तैवानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
चीनकडून तैवानविरोधात सुरू झालेल्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानसह अमेरिकेनेही जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यात, अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षणसाहित्य पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यात लढाऊ विमानांसह ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘पॅट्रिऑट मिसाईल सिस्टीम’ तसेच टोर्पेडोचा समावेश आहे. त्याचवेळी अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, बॉम्बर्स, ड्रोन्स व टेहळणी विमानांची तैनाती आणि वावरही वाढविला आहे. तैवानवरील संभाव्य हल्ल्याविरोधात अमेरिकेला लष्करी कारवाईची परवानगी देणारा ‘तैवान इन्व्हेजन प्रिव्हेंशन ॲक्ट’ अमेरिकेच्या संसदेत दाखल करण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेचे आरोग्यमंत्री अलेक्स अझार तैवान दौऱ्यावर दाखल झाले होते. त्यानंतर अमेरिकेने तैवानला ६६ प्रगत ‘एफ-१६व्ही’ लढाऊ विमाने पुरवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत.
अमेरिका तैवानमधील या वाढत्या सहकार्याने चीन बिथरला असून या क्षेत्रात चिथावणी देण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |