रशिया, चीन, इराण व पाकिस्तानमध्ये सक्रीय असलेले अमेरिकेच्या सीआयएचे एजंट्स मारले गेले

- सीआयएच्या ‘काऊंटरइंटेलिजन्स मिशन सेंटर’ची कबुली

वॉशिंग्टन – अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने परदेशातील आपले एजंट मारले गेल्याची तसेच पकडले गेल्याची कबुली दिली आहे. गेल्या आठवड्यात ‘सीआयए’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जगातील सर्व स्टेशन्स व तळांवर यासंदर्भात इशारा देणारा संदेश पाठविला आहे. अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. गेल्या दशकात चीनने ‘सीआयए’चे एजंट्सचे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचे दावे समोर आले होते. मात्र गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पाठविण्यात आलेला संदेश ही उघडपणे दिलेली पहिलीच कबुली मानली जाते.

सीआयए

गेल्या आठवड्यात ‘सीआयए’च्या ‘काऊंटरइंटेलिजन्स मिशन’ची जबाबदारी असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून जगभरातील सर्व ‘सीआयए स्टेशन्स’ व तळांना ‘सिक्रेट केबल’ पाठविण्यात आली. त्यात सीआयएचे ‘काऊंटरइंटेलिजन्स मिशन सेंटर’ परदेशी एजंट्ससंदर्भातील अनेक प्रकरणांवर काम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे परदेशी एजंट्स मारले गेले आहेत किंवा पकडण्यात आले असावेत, असे संदेशात सांगण्यात आले. संदेशात अशा एजंट्संची संख्याही नमूद करण्यात आली असून ती खूप मोठी आहे. जगातील गुप्तचर यंत्रणांकडून अशा प्रकारे सहसा कबुली दिली जात नसल्याने ही माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

या संदेशात परदेशी गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या एजंट्सविरोधात आक्रमक मोहीम राबवित असल्याचेही सांगण्यात आले. परदेशी गुप्तचर यंत्रणांबद्दल सांगताना रशिया, चीन, इराण व पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला आहे. या देशांमध्ये सीआयए नेटवर्कचा भाग असलेल्या एजंट्स ची मोठ्या प्रमाणात हानी सोसावी लागल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी सीआयएसमोर असलेल्या विविध अडचणींचाही उल्लेख करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने सीआयएच्या ‘काऊंटरइंटेलिजन्स मिशन सेंटर’ची जबाबदारी असणार्‍या शीतल टी. पटेल यांनी यापूर्वी घेतलेल्या काही निर्णयांचाही उल्लेख केला आहे. त्यात, यावर्षी जानेवारी महिन्यात सीआयएच्या माजी अधिकार्‍यांना दिलेल्या इशार्‍याचा समावेश आहे. सीआयएच्या माजी अधिकार्‍यांनी परदेशी गुप्तचर यंत्रणांसाठी काम करू नये व पत्रकारांशी बोलू नये, असे पटेल यांनी बजावले होते. सीआयएत सध्या कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांनाही त्यांनी इशारा दिल्याचे सांगण्यात येते. गुप्तचर यंत्रणांच्या प्रवक्त्याने यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे.

परदेशातील सीआयए एजंट्स मारले जाण्यामागे, परदेशी यंत्रणांना कमी लेखणे हा एक महत्त्वाचा घटक ठरल्याचा दावा माजी अधिकारी व एजंट्सकडून करण्यात आला आहे. सीआयए एजंट्सचा माग काढून त्यांना लक्ष्य करण्याचे कौशल्य परदेशी यंत्रणांकडेही आहे, याचा सीआयएला विसर पडल्याची टीका माजी अधिकार्‍यांनी केली. त्याचवेळी दहशतवादाचा धोका व गुप्त संदेशयंत्रणा यावर अधिक भर देणेही अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला महाग पडल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

चीन व रशियाचे वाढते आव्हान आणि अफगाणिस्तानमधील माघार या पार्श्‍वभूमीवर ‘सीआयए’ला आपले नेटवर्क अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने आपल्या लेखात केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info