चीनच्या लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी – तैवानचे आंतरराष्ट्रीय समुदायाला सहाय्याचे आवाहन

चीनच्या लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी – तैवानचे आंतरराष्ट्रीय समुदायाला सहाय्याचे आवाहन

तैपेई/बीजिंग – अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी केथ क्रॅक यांचा दौरा, नव्या शस्त्रांचा प्रस्ताव आणि अमेरिकी संसदेत तैवानच्या समर्थनार्थ आणलेले विधेयक यामुळे चीनची सत्ताधारी राजवट चांगलीच बिथरल्याचे समोर आले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांचा दौरा सुरू असतानाच चीनच्या तब्बल ३७ लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्यापाठोपाठ चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रानजिक नव्या युद्धसरावाला सुरुवात केली असून, हा सराव म्हणजे तैवान ताब्यात घेण्याची रंगीत तालीम असल्याची धमकी चिनी माध्यमांकडून देण्यात आली आहे. चीनच्या या कारवायांच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय समुदायाने लोकशाहीवादी तैवानच्या सुरक्षेसाठी एकत्र येऊन सहाय्य करावे, असे आवाहन तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी केले.

गुरुवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी केथ क्रॅक व शिष्टमंडळ तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यासाठी दाखल झाले होते. शुक्रवारी क्रॅक यांच्यासह अमेरिकी शिष्टमंडळाने तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांची भेट घेतली. त्याव्यतिरिक्त अमेरिकी शिष्टमंडळाने तैवानचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान तसेच अर्थ व व्यापार विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. शनिवारी तैवानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माजी राष्ट्राध्यक्ष ली तेंग हुई यांच्या स्मृति कार्यक्रमालाही अमेरिकी शिष्टमंडळ उपस्थित होते. अवघ्या महिन्याभरात आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैवान भेटीवर धाडून अमेरिकेने तैवानबरोबरील संबंध अधिक दृढ करण्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिका व तैवानची ही वाढती जवळीक चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला चांगलीच झोंबली आहे. चीनने गेल्या दोन दिवसात केलेल्या कारवाया सत्ताधारी राजवटीचा उडालेला भडका स्पष्ट दाखवून देणाऱ्या ठरतात. शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न करून जबरदस्त दडपण आणण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी १८ तर शनिवारी १९ विमानांनी तैवानच्या हद्दीवर धडक दिल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. सलग दोन दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घुसखोरी पाठोपाठ चीनच्या संरक्षणदलाने तैवानच्या सागरी क्षेत्रानजिक नव्या युद्धसरावाला सुरुवात केल्याचेही समोर आले आहे. या सरावात युद्धनौका, विनाशिका, लढाऊ तसेच बॉम्बर्स विमाने, पाणबुड्या व हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.

चीनच्या या सरावाला तैवान व तैवानला सहाय्य करणाऱ्यांनी कमी लेखू नये; हा सराव म्हणजे तैवान ताब्यात घेण्याची रंगीत तालीम आहे, अशी धमकी चिनी माध्यमांकडून देण्यात आली आहे. चीनच्या संरक्षणविभागानेही सरावाचे समर्थन करताना अमेरिका व तैवानला धमकावले आहे. ‘तैवानचा वापर करून चीनवर नियंत्रण ठेवण्याचा विचार करणारे किंवा परदेशी शक्तींच्या सहाय्याने सामर्थ्य वाढविण्याच्या योजना आखणारे त्यांच्या कल्पनेचे खेळ खेळत आहेत. जे आगीशी खेळण्याचा विचार करीत आहेत, त्यांनी तेदेखील जळणार आहेतच हे नीट लक्षात ठेवावे’, अशी धमकी चीनच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते रेन गुओकीआंग यांनी दिली.

चीनच्या विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी व युद्धसराव यावर अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अमेरिकेने आदरांजली व्यक्त करण्यासाठी शिष्टमंडळ धाडले असताना चीनने लष्करी सामर्थ्याचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. चीनकडून गेल्या महिन्याभरात तैवानच्या हद्दीनजिक एकामागोमाग एक युद्धसराव आयोजित करण्यात येत असून हा तैवानसह अमेरिकेविरोधातील दबावतंत्राचा भाग असल्याचा दावा विश्लेषकांकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, अमेरिकेबरोबरच जपाननेही तैवानशी सहकार्य वाढविण्याचे संकेत दिले आहेत. जपानचे माजी पंतप्रधान योशिरो मोरी यांनी शनिवारी शिष्टमंडळासह तैवानला भेट दिली. यावेळी त्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी जपानचे नवे संरक्षणमंत्री म्हणून नोबुओ किशी यांची झालेली नियुक्ती चीनसाठी नवी डोकेदुखी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. किशी हे माजी पंतप्रधान शिंझो ॲबे यांचे छोटे भाऊ असून, गेली अनेक वर्षे जपान-तैवान सहकार्यासाठी ‘कॉन्टॅक्ट मॅन’ म्हणून सक्रिय होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांची भेट घेतली होती, असे सांगण्यात येते. किशी यांच्या नियुक्तीनंतर जपानचे नवे पंतप्रधान योशीहीदे सुगा तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरुन चर्चा करणार असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info