अझरबैजानच्या हवाईतळावर तुर्कीची ‘एफ-१६’ असल्याचे उघड – सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध

अझरबैजानच्या हवाईतळावर तुर्कीची ‘एफ-१६’ असल्याचे उघड – सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध

बाकु/येरेवान/मॉस्को – तुर्कीने आपली प्रगत ‘एफ-१६ वायपर’ लढाऊ विमाने अझरबैजानच्या हवाईतळावर तैनात केल्याची माहिती उपग्रहांद्वारे मिळालेल्या फोटोग्राफ्समधून उघड झाली आहे. या माहितीमुळे तुर्की आर्मेनिया-अझरबैजान युद्धात मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी आर्मेनियाने, तुर्कीच्या ‘एफ-१६’ विमानाने आपले विमान पाडल्याचा आरोप केला होता. मात्र त्यावेळी तुर्कीने हे आरोप नाकारले होते. मात्र आता उपग्रहांकडील माहिती समोर आल्याने तुर्कीचा खोटेपणा उघड झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आर्मेनिया व अझरबैजानमध्ये चर्चेला सुरुवात झाली असून त्यात दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसह रशियाचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत.

 'एफ-१६'

सलग १३ दिवस आर्मेनिया व अझरबैजानमध्ये जोरदार युद्ध सुरू असून, दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे मानले जाते. आर्मेनियाने आपल्याकडील जीवितहानीची आकडेवारी जाहीर केली असली, तरी अझरबैजानने मात्र नागरिकांव्यतिरिक्त झालेल्या लष्करी हानीची माहिती उघड केलेली नाही. स्थानिक माध्यमे व सूत्रांच्या दाव्यांनुसार, युद्धात दोन्ही देशांमधील हजारोजणांचा बळी गेला आहे. शुक्रवारी अझरबैजानने ‘नागोर्नो-कॅराबख’मधील अनेक गावे ताब्यात घेतल्याचा दावा केला. तर आर्मेनियाने, अझरबैजानी लष्कर ख्रिस्तधर्मियांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप केला. शुशा शहरातील एका प्राचीन प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्याचे फोटोग्राफ्सही आर्मेनियाने प्रसिद्ध केले आहेत.

 'एफ-१६'

या पार्श्वभूमीवरच, तुर्कीचा आर्मेनिया-अझरबैजानमधील सक्रिय सहभाग उघड झाला आहे. ‘सॅटेलाईट इमेजरी’ क्षेत्रातील कंपनी ‘प्लॅनेट लॅब्स’ व अमेरिकी दैनिक ‘न्यूयॉर्क टाईम्स’ यांनी याची माहिती समोर आणली. गेल्या आठवड्यात ‘प्लॅनेट लॅब्स’ने अझरबैजानमधील काही ‘सॅटेलाईट फोटोग्राफ्स’ प्रसिद्ध केले होते. त्याचा अभ्यास करून ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने अझरबैजानमधील हवाईतळावर तुर्कीची किमान दोन ‘एफ-१६ वायपर’ लढाऊ विमाने तैनात असल्याचे म्हटले आहे. तुर्की व अझरबैजानमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या सरावासाठी तुर्कीने आपली लढाऊ विमाने तैनात केली होती.

 'एफ-१६'

मात्र सराव झाल्यानंतरही तब्बल दोन महिने तुर्कीची प्रगत लढाऊ विमाने अझरबैजानमध्ये तैनात असणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या लढाऊ विमानांबरोबरच, तुर्कीचे ‘सीएन-२३५’ हे लष्करी विमानही अझरबैजानमध्ये तैनात असल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्यात आर्मेनिया-अझरबैजान युद्ध भडकल्यापासून तुर्कीने उघडपणे अझरबैजानची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविण्यास सुरुवात केली होती. तुर्की ड्रोन्स युद्धात सहभागी असल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांपूर्वीच अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्की ड्रोन्स प्रभावी ठरत असल्याचे वक्तव्यही केले होते. पण तुर्कीची लढाऊ विमाने युद्धक्षेत्राच्या नजिक असणाऱ्या तळावर तैनात असणे, ही बाब अत्यंत गंभीर ठरू शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीच तुर्कीने अझरबैजानमध्ये सिरियन दहशतवादी पाठविल्याचे समोर आले असून, त्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाने तुर्कीला धारेवर धरले आहे.

दरम्यान, शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आर्मेनिया व अझरबैजानमधील चर्चेला सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही चर्चा, आर्मेनिया-अझरबैजान युद्धात तोडगा काढण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न मानला जातो. मॉस्कोतील बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्यासह दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत. चर्चा सुरू होण्यापूर्वीच अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी, नवी चर्चा आर्मेनियाला दिलेली शेवटची संधी असल्याचा इशारा दिला आहे. तर आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी इतर देशांनी ‘नागोर्नो-कॅराबख’ला मान्यता दिल्यास समस्या सुटू शकते, असा दावा केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info