इराण सहजपणे अणुबॉम्बची निर्मिती करू शकेल – इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या प्रवक्त्यांचा दावा

इराण सहजपणे अणुबॉम्बची निर्मिती करू शकेल – इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या प्रवक्त्यांचा दावा

तेहरान – ‘इराणने सजहरित्या कुठल्याही स्तरापर्यंत युरेनियमचे संवर्धन नेण्याइतकी प्रगती केली आहे. अगदी २० टक्क्यांपासून ते ४० टक्के, ६० टक्के आणि ९० टक्क्यांपर्यंतही इराण युरेनियमचे संवर्धन करू शकतो. पण सध्या त्याची आवश्यकता आहे का? यावर इराण विचार करीत आहे’, अशी घोषणा इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रवक्ते बहरोज कमालवंदी यांनी केली. युरेनियमचे संवर्धन ९० टक्क्यांपर्यंत करणे म्हणजे अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचल्याचा आरोप इस्रायलने केला होता. त्यामुळे कमालवंदी यांनी ही माहिती जाहीर करून इस्रायलसह पाश्‍चिमात्य देशांना इशारा दिल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

२०१५ साली पाश्‍चिमात्य देशांबरोबर केलेल्या अणुकरारातून माघार घेणार्‍या इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग तीव्र केल्याचे गेल्या आठवड्याभरातील घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यात ३१ डिसेंबर रोजी इराणने ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगा’ला (आयएईए) पाठविलेल्या पत्रात फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा इशारा दिला होता. इराणच्या या पत्राची माहिती दोन दिवसानंतर माध्यमांमध्ये उघड झाली होती.

पाच वर्षांपूर्वी इराण आणि पाश्‍चिमात्य देशांमध्ये झालेल्या अणुकराराप्रमाणे फोर्दो अणुप्रकल्पात कुठल्याही प्रकारची आण्विक हालचाल निषिद्ध आहे. सदर प्रकल्पाचा वापर तंत्रज्ञानविषयक केंद्र म्हणून चालविण्यासाठी इराणला परवानगी दिली होती. त्याचबरोबर इराणच्या युरेनियम संवर्धनाचे प्रमाण ३.६७ टक्के इतके मर्यादित करण्यात आले होते. तरीही गेल्या वर्षी अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणने युरेनियमचे संवर्धन ४.५ टक्क्यांपर्यंत नेल्याचे जाहीर केले होते.

अशा परिस्थितीत, युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याची इराणची घोषणा अमेरिका, इस्रायलसह पाश्‍चिमात्य देशांसाठी इशारा ठरतो, असा दावा केला जात होता. त्यावर युरोपातील ‘ई-३’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीकडून प्रतिक्रियाही उमटली होती.

‘इराणने युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याची प्रक्रिया त्वरीत बंद करावी. येत्या काळात अणुकार्यक्रमाबाबत वाटाघाटींची शक्यता मावळेल, असे कुठलेही प्रक्षोभक निर्णय इराणने घेऊ नये’, असे या तीनही देशांनी आपल्या संयुक्त पत्रकातून इराणला बजावले होते. तसेच ‘इराणने अणुकराराचे उल्लंघन करून अणुकार्यक्रमात आक्रमक बदल केल्यास त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. इराणच्या या हालचाली धोकादायक ठरतील’, असा इशाराही ‘ई-३’ सदस्य देशांनी दिला होता.

‘ई-३’ सदस्य देशांची ही प्रतिक्रिया येईपर्यंत इराणने फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. इराणच्या रोहानी सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी पत्रकारांसमोर ही माहिती जाहीर केली होती. तर गुरुवारी इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रवक्ते कमालवंदी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत, अजून धक्कादायक माहिती उघड केली.

युरेनियमच्या संवर्धनाचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे तंत्रज्ञान इराणकडे असल्याचे कमालवंदी यांनी सांगितले. इराणच्या संसदेने २० टक्क्यांच्या मर्यादेपलिकडे युरेनियमचे संवर्धन करण्याची परवानगी दिली आहे. पण सध्या एवढ्या प्रमाणात युरेनियमचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे का? यावर इराण विचार करीत असल्याचे कमालवंदी म्हणाले.

युरेनियमचे संवर्धन ९० टक्क्यांपर्यंत नेल्यास इराण अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचेल, असा आरोप इस्रायलने याआधी केला होता. त्याचबरोबर काहीही झाले तरी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे. त्यामुळे इराणच्या या घोषणेवर इस्रायलकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info